जुन्या सुपा एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:59+5:302021-01-13T04:50:59+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीकडे ...

Poor condition of roads in old Supa MIDC | जुन्या सुपा एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था

जुन्या सुपा एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षाने रस्त्यांचे रूपडे बदलून गेले आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या दुरुस्तीवरील खर्च वाढत असल्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, कारखान्यात काम करणारे कामगार, अधिकारी सांगतात. एमआयडीसी रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकावर वेगवेगळी फूलझाडे लावलेली आहेत. परंतु, त्याच्या संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षाने त्यात गवत वाढले आहे. वेळोवेळी झाडांची देखभाल करण्यात न आल्याने ही झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. त्यामुळे रस्ता आकर्षक दिसण्याऐवजी विद्रूप झाल्याचे पहावयास मिळते. देखभालीसाठी आर्थिक तरतूद नसेल तर त्या त्या रस्त्यालगत असणाऱ्या कारखान्यांवर जबाबदारी सोपविली तरी झाडांचे विद्रूपीकरण होण्याचे थांबेल.

नवीन वसाहतीतील चकाचक भव्य चार पदरी रस्ता, मधोमध दुभाजकावर बहरलेली फूलझाडे यामुळे एखाद्या मोठ्या शहरातील इंडस्ट्रीयल एरियात आल्याचा भास होतो. तेच जुन्या एमआयडीसीत ते दुर्लक्षित असल्याची जाणीव पदोपदी होत असल्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून जुन्या वसाहतीतील रखडलेल्या कामाबाबत सापत्न वागणूक दिली जाते की काय, असाही प्रश्न तेथील कारखानदार उपस्थित करत आहेत. एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणारी वाहिनी सातत्याने फुटत असल्याने कारखान्यासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही विस्कळीतपणा येत असल्याची माहिती सुपा एमआयडीसी कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी दिली. त्यातही सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. आठवडाभरापेक्षा जास्त काळ पाणी बंद राहते, अशावेळी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. या बाहेरच्या पाण्याने कारखान्यातील उत्पादित मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने कारखान्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने उपाययोजना करावी, अशी मागणीही धूत यांनी केली.

फोटो १० सुपा रोड

सुपा येथील जुन्या एमआयडीसीतील खड्डे पडलेला रस्ता.

Web Title: Poor condition of roads in old Supa MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.