पडकी घरे, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी : पोलीस कॉलनीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:13 PM2019-06-15T19:13:13+5:302019-06-15T19:13:36+5:30
तुटलेली कौले, उखणलेल्या भिंती, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी आणि घाणीचे साम्राज्य अशी भयानक अवस्था नगर शहरातील पोलीस कॉलनीची आहे़
अरुण वाघमोडे
अहमदनगर: तुटलेली कौले, उखणलेल्या भिंती, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी आणि घाणीचे साम्राज्य अशी भयानक अवस्था नगर शहरातील पोलीस कॉलनीची आहे़ याच पोलीस कॉलनीत गुरुवारी दुपारी पोलीस हवालदार सुनील कुºहे यांची मुलगी पूजा हिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे़
पोलीस कॉलनीत शुक्रवारी सकाळीच महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले़ विजेच्या तारांना अडचणीचे ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या तर तुटलेल्या तारा दुरुस्त केल्या़ शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पोलीस कॉलनीला भेट देऊन पाहणी केली़ यावेळी पोलीस कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या़ या कॉलनीत पाणी वेळेवर येत नाही, रस्ते खराब झालेले आहेत़ महापालिका कचरा उचलून नेत नाही, सर्वत्र घाण आहे़ आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अशा तक्रारी केल्या़ पोलीस बॉईज असोसिएशनच्या सदस्यांनीही येथे कुठल्याच सुविधा दिल्या जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला़ या विषयावर सिंधू यांनी सायंकाळी अधीक्षक कार्यालयात महावितरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे सांगितले़
घटनेच्या एक दिवस आधी दिली होती तक्रार
पूजा कुºहे हिच्या मृत्युच्या आधी सहायक फौजदार डी़एफ पाठक राजगुरू यांनी महावितरणच्या दिल्ली गेट येथील सहायक अभियंता कार्यालयात तक्रार दिली होती़ १० मे रोजी झालेल्या पावसामुळे पोलीस कॉलनीतील तारा तुटलेल्या आहेत़ तीन दिवसांपासून येथे वीज नाही़ या आधी तारा तुटून एका म्हशीचा मृत्यू झाला होता़ याची दखल घेऊन तातडीने येथील वीज तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती़ महावितरणच्या अधिकाºयांनी या तक्रारीची दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव वाचला असता़
़़तर आमचे मतदान मागायला येऊ नका
च्पोलीस कॉलनीत शुक्रवारी महापालिकेचे कचरा व्यवस्थापन प्रमुख सुरेश इथापे आले होते़ यावेळी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला़ लोकप्रतिनिधींना आमचे मतदान हवे असते मात्र आम्हाला येथे सुविधा दिल्या जात नाहीत़ येणाºया काळात आवश्यक त्या सुविधा मिळाल्या नाही तर आमचे मतदान मागायला येऊ नका़ यादीतून आमची नावे वगळून टाका असा संताप व्यक्त करण्यात आला़
सर्वच घरे बनलीत धोकादायक
च्पोलीस कॉलनीत पोलीस कर्मचाºयांसाठी ५१२ घरे आहेत़ या ठिकाणी साडेतीनशे पोलिसांचे कुटुंबीय राहतात़ हे घरे १०० वर्षांपूर्वीचे आहेत़ त्यामुळे ही संपूर्ण कॉलनीच धोकादायक बनली आहे़ या ठिकाणी पोलिसांसाठी नवीन घरांना मंजुरी मिळालेली आहे़ या कामाला मात्र अजून मुहुर्त मिळालेला नाही़ दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच कॉलनीत राहणारा ओम शिंदे यालाही विजेचा धक्का बसल्याचे त्याने सांगितले़
पोलीस कॉलनीत कोणत्याच मुलभूत सुविधा मिळत नाहीत़ पावसाळ्यात तर सर्वत्र पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतो़ त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात़ आम्हाला आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात़ -वैशाली गारुडकर, रहिवासी
येथील कचरा उचलला जात नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत, विजेच्या तारा वारंवार तुटतात, पाणी वेळेवर मिळत नाही़ या कॉलनीत राहणे अवघड झाले आहे़ - ज्योती कवडे, रहिवासी
पोलीस कॉलनीतील तुंबलेल्या गटारींमुळे खराब पाणी नळांमध्ये जाते़ मूलभूत सुविधांबाबत महावितरण, बांधकाम आणि महापालिका यांना वारंवार तक्रारी करूनही ते दखल घेत नाहीत़ सुविधा नसल्याने पोलीस कॉलनीतील सर्वच रहिवासी हैराण झाले आहेत़ प्रशासनाने आमच्या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी़ -नितीन खंडागळे, अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन
पोलीस कॉलनीत पुन्हा काही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ वीजप्रवाह सुरळीत करून घरांवर वाढलेल्या झांडांच्या फांद्या तोडल्या आहेत़ या ठिकाणी नवीन घर प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे़ येत्या काही दिवसांत या प्रकल्पाचे काम सुरू होईल़ -अरुण जगताप, पोलीस उपाधीक्षक(गृह)