बेलापुरातून व्यापारी बेपत्ता; अपहरणाची शक्यता, एका व्हॅनमधून पळवल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:54 AM2021-03-02T10:54:08+5:302021-03-02T10:55:55+5:30
बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
श्रीरामपूर : बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता बेलापूर व श्रीरामपूर येथील मर्चंट असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली आहे. यात सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी व्यापाऱ्यांनी संपर्क केला आहे. सायंकाळपर्यंत तातडीने हिरण यांचा शोध घ्यावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
हिरण यांची बेलापुरात एका नामांकित कंपनीची एजन्सी आहे. सोमवारी सायंकाळी गोदामातून बाहेर पडलेले हिरण घरी निघाले होते. मात्र त्याचवेळी एका व्यक्तीने कारचा बिघाड झाला असून हिरण यांच्याकडे मदतीची मागणी केली. या अज्ञात व्यक्तीने जॅकेट घातले असल्याचे काही लोकांनी सांगितले. हिरण यांनी एका मेकॅनिककडून कार दुरुस्तीसाठी साहित्य घेतले होते. ते कार दुरुस्ती करिता निघाले असता व्हॅनमध्ये त्यांना बसवले असे काही लोकांनी पाहिले.
व्हॅनमध्ये बसलेली एक व्यक्ती सोडा सोडा म्हणत दरवाजाला लाथा मारत होती असे श्रीरामपूर-बेलापूर बायपासवरील काही लोकांनी पाहिली. ते वाहन श्रीरामपूरच्या दिशेने गेले. त्यामुळे ती व्यक्ती हिरण होती का? तसेच त्यांचे अपहरण झाले का? अशी चर्चा आहे.
बेलापुरातील सीसीटीव्हीमध्ये ही व्हॅन दिसत आहे. मात्र क्रमांक त्यात दिसत नाही. त्यामुळे तपासाला अडचणी येत आहेत. या घटनेमुळे बेलापुरातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हिरण यांची मोटरसायकल श्रीरामपूर-बेलापूर बायपासला उभी आहे. गाडीला चावी व कागतपत्रांची पिशवीही तशीच आहे.