सारोळा कासारच्या सरपंचाचे पद फेरचौकशीनंतर पुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:14+5:302021-02-05T06:27:14+5:30
केडगाव : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या थेट जनतेमधून निवडल्या गेलेल्या सरपंच आरती ...
केडगाव : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या थेट जनतेमधून निवडल्या गेलेल्या सरपंच आरती रवींद्र कडूस यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा रद्द केले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार फेरचौकशी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा आदेश दिला आहे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरती कडूस या सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या. यानंतर गावातील भाऊसाहेब माधव कडूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच आरती कडूस यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करून त्यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली होती.
आरती कडूस यांचे पती रवींद्र कडूस हे नगर तालुका पंचायत समितीचे वाळकी गणाचे सदस्य आहेत. सारोळा कासार ग्रामपंचायत हद्दीत त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जागा असल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या जागे व्यतिरिक्त सार्वजनिक जागेत अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सरपंच आरती कडूस यांचे सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी भाऊसाहेब कडूस यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची मोजणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आरती कडूस यांचे सरपंचपद ३ जुलै २०२० रोजी रद्द केले होते. या निर्णयाविरोधात कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपिल केले. त्यांचे अपिल अंशतः मान्य करत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना फेरचौकशी करून निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने केलेल्या फेरचौकशीत कडूस यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कडूस यांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य राहण्यास अपात्र ठरवून त्यांची निवड रद्द केली आहे.
----
चौकशी समितीने सर्व चौकशी करून त्याचा अहवाल सादर केला. त्यात आम्ही दोषी आढळ्लो नाही. मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून हे सर्व घडवून आणले. कुठलेच अतिक्रमण केले नसताना केवळ राजकीय जीवनातून संपवण्याच्या हेतूने हे कारस्थान रचण्यात आले.
-आरती कडूस,
सरपंच, सारोळा कासार