पोस्टातील कर्मचा-यानेच मारला पैशावर डल्ला : संगमनेर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:04 PM2019-08-23T12:04:47+5:302019-08-23T12:05:02+5:30
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मांडवे बुद्रूक पोस्टाच्या शाखेतील डाकपालाने वीस हजार दोनशे चौदा रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे पोस्टाचे कार्यालय आहे. या पोस्टात ग्राहकांनी सुकन्या समृद्धी योजना व ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी योजना मध्ये १४ फेब्रुवारी २०१७ ते २७ डिसेंबर २०१७ च्या दरम्यान वीस हजार दोनशे चौदा रुपये कार्यालयातील डाकपाल पांडुरंग नामदेव केदार (रा.मांडवे बुद्रूक, ता.संगमनेर) यांच्याकडे जमा केले होते. पोस्ट खात्यात पैसे जमा केल्यानंतर केदार यांनी पासबुकमध्ये पैसे भरल्याची तारीख व किती पैसे भरले यांची नोंद शिक्का मारून दिली होती.
मात्र, जमा झालेल्या रकमेची नोंद शाखा कार्यालय खात्यात न करता, तसेच रक्कम शासन खात्यात जमा न करता शासनाची व खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप केदार यांच्यावर करण्यात आला आहे. पोस्ट खात्याच्या चौकशी अंती ही बाब लक्षात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी कार्यालयीन चौकशीत पांडुरंग केदार हे दोषी आढळल्याने घारगाव पोलीस ठाण्यात संतोष सुरेश जोशी (सहायक अधीक्षक, डाकघर संगमनेर उपविभाग)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.एस.वायळ करीत आहेत.