श्रीरामपुरातील हे पोस्टमनकाका ठरले खासच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:58+5:302021-06-11T04:14:58+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील अजिज गफूर पठाण या पोस्टमनकाकांनी लोकमतकडे भावना व्यक्त केल्या. ते वयाच्या ६५ व्या वर्षी २२ ...
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील अजिज गफूर पठाण या पोस्टमनकाकांनी लोकमतकडे भावना व्यक्त केल्या. ते वयाच्या ६५ व्या वर्षी २२ जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी गुजरवाडी, वांगी, खिर्डी या गावांत ग्रामीण डाक सेवक म्हणून काम केले. एकाच ठिकाणी त्यांनी ४७ वर्षांची सेवा बजावली.
स्वत:चे तसेच मुलगा व मुलीचे लग्नदेखील रविवारी सुट्टीच्या दिवशी केले. मात्र कधीही रजा घेतली नाही. कुटुंबात आई, मुलगा व नाती असा परिवार आहे.
वयाच्या १८व्या वर्षी पठाण यांनी नोकरीला प्रारंभ केला. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे वडील हे शिक्षक होते. वडिलांच्या प्रोत्साहानामुळेच मी हे काम स्वीकारले. त्यावेळी ५६ रुपये ६० पैसे पगार होता. मात्र मला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. त्यामुळे सर्व पैसे वडिलांकडे देत होते, असे पठाण यांनी सांगितले.
---------
एकाच सायकलवर नोकरी
पठाण यांनी नोकरी मिळताच १९७४ मध्ये ३०० रुपयांना सायकल खरेदी केली. त्याच सायकलवर आता ते निवृत्त होणार आहेत. दररोजचा वापर व देखभाल ठेवल्यामुळे सायकल आजही चांगल्या स्थितीत आहे.
------------
सेवाकाळात एकही तक्रार नाही
संपूर्ण सेवाकाळात पठाण यांनी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम केले. कुणाचेही पत्र गहाळ केले नाही अथवा उशिरा पत्र पोहोचविले नाही. त्यामुळे चार गावांतील कोणत्याही नागरिकाने आजवर त्यांच्या विरोधात साधी तक्रारही केली नाही.
----------
कोरोना काळातही मी घरी थांबलो नाही. सातत्याने कामावर राहिलो. तब्येत ठणठणीत आहे. निवृत्तीनंतर मला वेतन मिळावे ही सरकारकडे मागणी आहे.
- अजिज पठाण, ग्रामीण डाक सेवक, खिर्डी, श्रीरामपूर.
-------