शिष्यवृत्तीची परीक्षा स्थगित करा, अन्यथा बहिष्कार ; शिक्षक भारती संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 05:33 PM2021-05-07T17:33:19+5:302021-05-07T17:33:49+5:30
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
अहमदनगर : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जर परीक्षा पुढे ढकलली नाही तर शिक्षक भारती परीक्षेवर बहिष्कार टाकेल, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करून त्याची तयारी केली आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांना पत्र पाठवली आहेत. कोरोनामुळे देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकललेली असताना तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा अट्टाहास परीक्षा परिषद का करत अहो, असा सवाल शिक्षक भारती संघटनेने विचारला आहे. १४ जून पर्यंत उन्हाळी सुटी असल्यामुळे अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. शिवाय कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची परीक्षा घेणे धोक्याचे आहे. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करावी, अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, मोहमंद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरु, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, आशा मगर, विभावरी रोकडे मिनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर आदींनी दिला आहे.