पारनेर सैनिक बँकेतील सभासद वाढीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:32+5:302021-08-23T04:23:32+5:30
अहमदनगर : पारनेर सैनिक बँकेत एकाच दिवसात तब्बल १४०५ जणांना सभासदत्व देण्यात आले होते. याविरोधात सहकारमंत्र्यांसमोर नुकतीच सुनावणी झाली ...
अहमदनगर : पारनेर सैनिक बँकेत एकाच दिवसात तब्बल १४०५ जणांना सभासदत्व देण्यात आले होते. याविरोधात सहकारमंत्र्यांसमोर नुकतीच सुनावणी झाली असून, बँकेच्या या सभासद नियुक्ती आदेशाला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा स्थगिती आदेश लागू असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
एकाच दिवसात तब्बल १४०५ सभासद करण्याच्या बँकेच्या निर्णयाविराेधात बँकेचे सभासद सुदाम कोथंबिरे, बबन दिघे, संपत शिरसाट, बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी यांनी सहकार मंत्री पाटील यांच्याकडे पुनरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. या सुनावणीला बाळासाहेब नरसाळे व त्यांचे वकील आयेशा केशोडवाला तसेच बँकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नरसाळे यांनी मंत्र्यांसमोर युक्तीवाद मांडताना सांगितले की, २६ जुलै २०१९ रोजी कोणतीही कायदेशी प्रक्रिया पार न पाडता बँकेने एकाच दिवसात बँकेच्या अध्यक्षांच्या मर्जीतील १४०५ लोकांना सभासद करून घेतले. याविरोधात वारंवार तक्रार अर्ज केल्यानंतर व न्यायालयात दाद मागितल्यानंतर या प्रकरणाची सहायक निबंधकांमार्फत चौकशी झाली. हा चौकशी अहवाल ७ जुलै २०२० रोजी जिल्हा उपनिबंधकांना सादर करण्यात आला. या अहवालानुसार बँकेने केलेल्या नवीन सभासदांपैकी १४४ जणांच्या सभासद अर्जावर सह्या नव्हत्या. तसेच केवायसीची देखील पूर्तता नव्हती. यातील हस्ताक्षरावरून हे अर्ज तीन ते चार जणांनीच लिहिले होते. हा अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. मात्र, याबाबत पुन्हा चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पुन्हा चौकशी झाली व १४३ जणांना अपात्र ठरविण्यात आले. यावर सहकार आयुक्तांसमोर सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीला तक्रारदारांना बोलावण्यात आले नव्हते. तक्रारदारांना म्हणणे मांडण्याची देखील संधी दिली नाही. एकतर्फी सुनावणी घेत सहकार आयुक्तांनी १३९२ सभासद पात्र ठरवले. असे करताना त्यांनी सहायक निबंधकांच्या चौकशी अहवालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, असा युक्तीवाद नरसाळे यांच्यावतीने करण्यात आला. त्यावर सहकार मंत्री पाटील यांनी सहकार आयुक्तांच्या सभासद पात्र ठरविणाऱ्या २४ डिसेंबर २०२० राेजीच्या आदेशास अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली. तसेच पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी घेण्याचा आदेश दिला.
....................