लॉकडाउनच्या काळात तासातासाला वीजचे ब्रेकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:26 PM2020-04-11T16:26:55+5:302020-04-11T16:27:27+5:30
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात जनता घरीच बसून आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव या ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी असलेली सिंगलफेज वाहिनीवरील घरगुती वीज वारंवार ब्रेकडाउन होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पाचेगाव : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात जनता घरीच बसून आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव या ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी असलेली सिंगलफेज वाहिनीवरील घरगुती वीज वारंवार ब्रेकडाउन होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
गणेशखिंड उपकेंद्रातून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव तसेच श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी, खिर्डी, वांगी भागाला विजेचा पुरवठा केला जातो. सर्व गावांसाठी एकच सिंगलफेज वाहिनी असल्यामुळे उपकेंद्रातील रोहित्रावरील विजेचा भार वाढला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उपकेंद्रातील रोहित्राचे तापमान वाढत असून टप्याटप्याने फिडर ब्रेकडाउन करावे लागते, असे महावितरणचे स्थानिक कर्मचारी सांगतात.
राज्यात लॉकडाउनमुळे विजेची मागणी घटलेली आहे.औद्योगिक, वाणिज्य यांचा वीज वापर बंद आहे आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात महावितरणने घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा केली असतानाही ग्रामीण भागातील सिंगलफेज वाहिनीवरील वीज वारंवार गुल होत आहे. तब्बल दोन दोन तास वीज ब्रेकडाउन होत आहे. एकप्रकारे लॉकडाउनच्या काळात महावितरण ब्रेकडाउन झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. परिसरातील नागरिक घरात आहेत. घरातील करमणुकीचे साधने, पंखा, कुलर, आदी विजेअभावी बंद राहत आहेत. महावितरणने गणेशखिंड उपकेंद्रातून घरगुती ग्राहकांना अखंडपणे वीज द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.