पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन पुन्हा तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:21+5:302021-07-01T04:15:21+5:30
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मे महिन्याचे वडगावपान पंपिंग स्टेशनचे चालू वीज बिल ५ लाख ९ हजार ५४६ रुपये, तर ...
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मे महिन्याचे वडगावपान पंपिंग स्टेशनचे चालू वीज बिल ५ लाख ९ हजार ५४६ रुपये, तर निंबाळे जॅकवेलचे वीज बिल ६ लाख ९४ हजार २४३ रुपये आहे. तसेच निंबाळे जॅकवेल व वडगावपान पंपिंग स्टेशनची एकूण वीज बिल थकबाकी ६ कोटी ६३ लाख ९१ हजार १५० रुपयांवर पोहोचली आहे. वीज बिल वसुलीसाठी महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याचे योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले. तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा केली जात नाही. त्यामुळे या योजनेची वीज बिल थकबाकी ६ कोटी ६३ लाख ९१ हजार १५० रुपयांवर पोहोचली.
योजना चालविण्यासाठी येणारा खर्च व दरमहा येणारे वीज बिल भरण्याकामी आर्थिक अडचण निर्माण होते. पाणी सर्वांनाच हवे, मात्र 'पाणीपट्टी' नको, या मानसिकतेने अनेकांना ग्रासले. त्यामुळे योजना चालविण्यात आर्थिक अडचण निर्माण होते. शिवाय पाणीपट्टी भरणाऱ्या नळ कनेक्शन धारकांना नियमित पाणी मिळत नाही. काही ग्रामपंचायती तर पाणीपट्टीचा भार हलका करण्यासाठी नळ कनेक्शन्सची संख्या दडवीत आहेत. योजना सुरळीत चालण्यासाठी लाभार्थी गावांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविण्याची गरज आहे. योजनेद्वारे लाभार्थी गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी व वीज बिल भरण्यासाठी लाभार्थी गावांनी पाणीपट्टीच्या ठरवून दिलेल्या रकमा थकबाकीसह भराव्यात, असे आवाहन योजना समितीचे अध्यक्ष प्रभाकर कांदळकर व सचिव सुरेश मंडलिक यांनी केले आहे.
...............
पिण्याच्या पाण्याची निर्जळी
काही दिवसांपूर्वी तळेगाव प्रादेशिक योजनेच्या वडगावपान शिवारातील पाणी साठवण तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला होता. त्यानंतर योजनेच्या साठवण तलावातील पाण्याचे शुद्धीकरण सुरू करण्यात आल्याने लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर आता योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने लाभार्थी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची निर्जळी सुरू आहे.
फोटो : Talegaon Yojna
वडगावपान : तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेचा वडगावपान शिवारातील साठवण तलाव दिसत आहे.