वीजप्रश्नी कोकणगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:23 AM2021-03-01T04:23:01+5:302021-03-01T04:23:01+5:30
वीजबिलाच्या कारणाने आश्वी, कनोली, मनोली कोल्हेवाडी, रहीमपूर, जोर्वे, निंबाळे आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज ...
वीजबिलाच्या कारणाने आश्वी, कनोली, मनोली कोल्हेवाडी, रहीमपूर, जोर्वे, निंबाळे आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे लाट निर्माण झाली होती. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. आमदार विखे यांनीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले होते.
मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कोल्हार-घोटी या मार्गावर कोकणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
महाविकास आघाडी सरकार आणि वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी या राज्यातील एका मंत्र्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नाही, पण शेतकऱ्यांना कायद्याचा धाक दाखविला जातो. शेतकऱ्यांचे मागील वीजबिल माफ करा, वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश मागे घ्या. या मागण्या त्यांनी आपल्या भाषणात केल्या.
भाजपच्या किसान आघाडीचे अध्यक्ष सतीश कानवडे, शांताराम शिंदे, दिलीप इंगळे, श्रीराज डेरे, हरिश्चंद्र चकोर, गोकुळ दिघे, सचिन शिंदे, रवींद्र गाढे, शिवाजीराव कोल्हे, मंगेश शिंदे, मोहन वामन, दादासाहेब गुंजाळ, सुनील शिंदे, गंगाराम वर्पे, कैलास वायकर, आण्णासाहेब शिंदे, उत्तम वर्पे, ज्ञानदेव वर्पे, जितेंद्र शिंदे, सतीश वाळुंज, देविदास शिंदे, बाबासाहेब वाकचौरे या आंदोलनात सहभागी झाले होते.
अखेर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि अभियंता भांगरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.