अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:30+5:302021-06-30T04:14:30+5:30
अहमदनगर : महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा अनुक्रमे प्रत्येकी एक उमेदवारी ...
अहमदनगर : महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा अनुक्रमे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज घेतले होते; परंतु अखेरच्याक्षणी काँग्रेसने आघाडीला साथ देण्याची भूमिका घेतल्याने महापौर व उपमहापौरांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. परस्परविरोधी अर्ज दाखल न होण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
महापौर उपमहापौर निवडीसाठी बुधवारी (दि. ३०) ऑनलाईन सभा होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत होती. बुधवारी सकाळी महापौर निवडीच्या ऑनलाईन सभेत महापौर-उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. महापौर पदासाठी सेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला होता. महापौर सेनेचा, तर उपमहापौर पद राष्ट्रवादीला, असे सत्तेचे सूत्र मुंबईत झालेल्या बैठकीत ठरले होते. राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी मंगळवारी दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष माणिक विधाते, महिला आघाडीच्या शहरध्यक्षा रेश्मा आठरे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरुडे, सुरेश बनसोडे, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सुभाष लोंढे, अशोक बडे, दत्ता सप्रे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, गणेश कवडे, काँग्रेसचे गटनेते धनंजय जाधव, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, फारुक शेख आदी उपस्थित होते. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, कुमार वाकळे, मीना चोपडा यांची नावे चर्चेत होती. उपमहापौर पदाबाबत राष्ट्रवादीत अखेरच्या क्षणापर्यंत एकमत झाले नव्हते. शेवटच्या टप्प्यात भोसले यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर झाला. विद्यमान महापौरांची मुदत ३० जून रोजी संपत आहे. निवडणूक होत असलेले महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. राज्यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, नगरमधील राजकीय परिस्थिती पाहता सेना व राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा दोन्ही नेत्यांनी आदेश दिला. तोच आदेश पाळत आमदार संग्राम जगताप यांनी सेनेला साथ दिली. सेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक आवर्जून उपस्थित राहिले. महापौर पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी- काँग्रेसने एकत्र लढविली होती. आघाडीकडे २४ नगरसेवक आहेत. त्यादृ्ष्टीने काँग्रेसने महापौर पदावर दावा केला होता. परंतु, ऐनवेळी राष्ट्रवादी व सेनेने एकत्र येत काँग्रेसला बाजूला ठेवले. त्यामुळे काँग्रेसने महापौर व उपमहपाैर पदासाठी अर्ज घेत एकप्रकारे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी काँग्रेसने वरिष्ठांच्या आदेशावरून आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे महापालिकेत १५ नगरसेवक आहेत. महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. परंतु, उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवारी देऊ शकत होती, पण भाजप तटस्थ राहिले. काँग्रेसने आघाडीला दिलेली साथ आणि भाजपने तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका यामुळे महापौर व उपमहापौरांची निवडणूक बिनविरोध झाली.
.....
मुख्यमंत्र्यांच्या आघाडीला साथ
महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर थोरात यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत वेगळी भूमिका घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेत आघाडीसोबत राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचे थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले.