पीपीई किटने आणला वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:08+5:302021-05-09T04:21:08+5:30

अहमदनगर : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला आहे. कोरोनाने नाही, पण ...

PPE kit brought annoyance | पीपीई किटने आणला वैताग

पीपीई किटने आणला वैताग

अहमदनगर : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला आहे. कोरोनाने नाही, पण या किटमुळे मरू, अशीच या आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती झाली आहे. सहा ते आठ तासांच्या कर्तव्यात त्वचेला त्रास होतो, तर घामाने जीव नकोसा होत असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जवळपास २६५ रुग्णालयांत कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई किटचा (पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्विपमेंट) वापर केला जातो. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात या किट दर्जेदार होत्या. नंतर मात्र, याचा दर्जा सुमार होत गेला. राज्यस्तरावर सर्व किट पुरविल्या जातात. या किटमुळे पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होत असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात.

सहा तास अंगावर किट असल्याने हवा लागत नाही. सर्व घाम पायाच्या बुटात जमा होतो. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी कंटाळले आहेत. काहीजण तर धोका पत्करून किटचा वापर करणे सोडले आहे. चेहऱ्याला मास्क अन् हातात ग्लोव्हज घालूून आरोग्य सेवा देत आहेत. मात्र, काही रुग्णालयांत किट परीधान करावेच लागत आहे.

--काय म्हणतात आरोग्य कर्मचारी..........

कोरोना केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवा नाही. त्यात पीपीई कीट सहा तास घालण्याचा आता वैताग आला आहे. दर १० मिनिटांनी ही किट काढाविशी वाटते. सध्या तरी काहीच उपचार नाही.

- एक आरोग्य कर्मचारी, खासगी रुग्णालय

---

आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तापमान ४२ अंशांवर गेले असताना पीपीई किट सहा तास अंगावर घालणे, यामुळे आता वैताग आला आहे. कोरोनाने नाही तर या किट घातल्याने मरण येईल, असे वाटते.

- एक आरोग्य कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय

---

सहा तास अंगावर किट घालून राहणे हे एक दिव्यच आहे. अंगाला घाम येतो. त्यामुळे शरीराला खाज सुटते. अशावेळी किट काढून टाकाविशी वाटते. परंतु दुसरा पर्यायदेखील नाही. आता या प्रकाराला कंटाळलो आहे.

- एक आरोग्य कर्मचारी, कोविड सेंटर

----------

राज्यस्तरावरून या पीपीई किटचा पुरवठा होतो, रोज हजारोपर्यंत किट लागतात. सहा तास अंगात घालून काम करावी लागतात. मागच्या उन्हाळ्यातदेखील सर्वांनी किट घालून काम केलेले आहे. यंदाही तीच परिस्थिती आहे.

-एक कर्मचारी, जिल्हा रुग्णालय

--------

काय म्हणतात डॉक्टर.....

आता डॉक्टरांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांची भीती कमी झाली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्यांदा झाला, त्यावेळी खूप भीती होती. कोरोनाच्या रुग्णाजवळही कोणी जात नव्हते. आता रुग्णांना हाताळण्याचे कौशल्य आले आहे. त्याचा परिणाम म्हणून भीती पळाली आहे, त्यात पीपीई किटचा कंटाळा आला आहे. त्यामुळे डॉक्टर शक्यतो किट घालत नाहीत.

-एक खासगी डॉक्टर, सावेडी

--------------

नेट फोटो

पीपीई

०७ पीपीई किट यूज डमी

Web Title: PPE kit brought annoyance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.