शिक्षिकेचे प्रतीकात्मक होळीद्वारे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:54+5:302021-03-29T04:15:54+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला शिक्षिकेने रविवारी (दि. २८) अनोख्या पद्धतीने प्रतीकात्मक ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला शिक्षिकेने रविवारी (दि. २८) अनोख्या पद्धतीने प्रतीकात्मक होळीद्वारे प्रबोधन केले. यावेळी त्यांनी परिसरातील कचरा गोळा करून पेटवून देत परिसर स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
बोधेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत अंजली तुकाराम चव्हाण या महिला शिक्षिका उपाध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती, कृत्रिम पाणवठे, शिक्षण आले दारी आदी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून त्या नेहमी इतरांसाठी प्रेरणादायी असे कार्य करत असतात. रविवारी सायंकाळी होळी सणानिमित्त त्यांनी घराशेजारील परिसराची झाडलोट करून स्वच्छता केली. जमा झालेला पालापाचोळा, कागद, प्लास्टिक आदी कचरा त्यांनी प्रतीकात्मक होळी पेटवून त्यात दहन केला. आपला परिसर स्वच्छ असेल तर रोगराईला आळा बसतो. परिणामी आपण निरोगी राहतो. यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असा पर्यावरणविषयक सामाजिक संदेश अंजली चव्हाण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. या प्रबोधनात्मक कार्याबद्दल त्यांचे सोशल मीडियातून कौतुक केले जात आहे.
--
२८ बोधेगाव होळी
बोधेगाव येथील शिक्षिका अंजली चव्हाण यांनी प्रतीकात्मक होळीत कचरा पेटवून परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.