महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा
By चंद्रकांत शेळके | Published: June 5, 2023 07:45 PM2023-06-05T19:45:57+5:302023-06-05T19:47:14+5:30
प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.
अहमदनगर: शेतकरी वर्गाला दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, तसेच जे रोहित्र नादुरुस्त होतात, ते ४८ तासांत बदलून देण्यात यावेत, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, विजय भंडारे, सुरेशराव लांबे, ऋषिकेश इरुळे, लक्ष्मीताई देशमुख, दादासाहेब काकडे, जयसिंग उगले, रामजी शिदोरे, सुदाम निकत, सुरेश सुपेकर, भगवान भोगाडे, सुरेशराव लांबे, मुकुंदराव आंधळे, रावसाहेब भोर, नानासाहेब पारधे, गोरक्ष पालवे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. असे असताना त्यांना वेळेवर वीज न मिळाल्याने पाणी असूनही त्यांची पिके वाया जातात. रात्री वीज असेल तर जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज गरजेची आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या आहेत. आंबीलवाडी फाटा, वंदे मळा येथील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार असून शेतामध्ये खांब वाकले आहेत. अनेक रोहित्रांची केबल जळालेली असून ते पावसाळ्याआधी बदलून मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन पूर्वीच देण्यात आले होते. परंतु दखल न घेतल्याने प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.
महावितरणचे आश्वासन
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे होण्याबाबत लेखी आश्वासन दिले. निंबोडी गावठाण येथे नवीन रोहित्र तातडीने मंजूर करण्यात आले आहे. रोहित्राची केबल, वाकलेले खांब, तारांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करू. ठेकेदारांबरोबर तशा बैठका घेऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.