भाजपाच्या सत्तेत प्रमोद महाजनांची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:13 PM2019-01-30T12:13:44+5:302019-01-30T12:14:41+5:30
भाजप सरकारने मोठा गाजवाजा करत प्रमोद महाजन यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या़ परंतु, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने त्यांच्या नावाने सुरू केलेले स्पर्धा परीक्षा केंद्र गुंडाळले आहे़
अण्णा नवथर
अहमदनगर : भाजप सरकारने मोठा गाजवाजा करत प्रमोद महाजन यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या़ परंतु, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने त्यांच्या नावाने सुरू केलेले स्पर्धा परीक्षा केंद्र गुंडाळले आहे़ त्यामुळे भाजपच्या सत्तेत स्व. प्रमोद महाजन यांची एकप्रकारे उपेक्षा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़
ग्रामीण भागातील तरुणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने महापालिकेने येथील प्रोफेसर चौकात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले़ या स्पर्धा परीक्षा केंद्राने राज्याला ५०० हून अधिक अधिकारी दिले़
गौरवशाली परंपरा असलेल्या या केंद्रावर युवकांच्या उड्या पडत असत. वाढत्या प्रतिसादामुळे जुनी इमारत कमी पडू लागली़ म्हणून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला़ पण, त्यासाठी निधी नव्हता़ शासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून १ कोटी २५ लाखांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला़ राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक विनीत पाऊलबुधे, माजी नगरसेवक सचिन पारखी यांनी निधीसाठी पाठपुरावा केला़ या निधीतून सावेडी परिसरात स्पर्धा परीक्षा केंद्राची टोलेजंग इमारत उभी राहिली़
नवीन इमारतीमुळे प्रवेश क्षमताही वाढली़ महापालिकेचा एकमेव आदर्श प्रकल्प, अशी या केंद्राची ओळख तयार झाली़ राज्यातील अन्य महापालिकांनी स्पर्धा परीक्षेचा नगर पॅटर्न स्वीकारला़ राज्यभर गाजलेला नगर पॅटर्न मात्र बंद पडला़ महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे युवकांचे अधिकारी होण्याचे स्वप्न हवेत विरले़ विशेष म्हणजे या केंद्राला स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे नावे दिले़ यावर कळस असा, एप्रिल २०१८ मध्ये महापालिकेत युतीची सत्ता होती़ त्यांच्या कार्यकाळात केंद्र बंद करून महाजन यांची उपेक्षा करण्यात आली हे विशेष़ महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची पूर्ण सत्ता आली़ सत्ता स्थापन होऊन महिना उलटला़ महापौर बाबासाहेब वाकळे व खासदार पुत्र सुवेंद्र गांधी, यांनी महापालिकेत अनेक बैठका घेतल्या़ परंतु, प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र का बंद पडले, याचा साधा जाबही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारल्याचे ऐकिवात नाही़
प्रकल्प संचालकांसह प्राध्यापकांचे ११ महिन्यांचे मानधन थकले
प्रकल्प संचालक एऩबी़ मिसाळ यांनी गेल्या ११ महिन्यातील प्राध्यापकांचे एक लाखाचे मानधन मिळावे, असा प्रस्ताव महापालिकेच्या प्रसिध्दी विभागाला सादर केला़ प्रसिध्दी विभागाने तो लेखा व वित्त विभागाला सादर केला़ मात्र अधिकाºयांनी मानधन देण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे प्रकल्प संचालक मिसाळ यांनी अखेर राजीनामा दिला़
४ विशेष म्हणजे त्यांचा राजीनामाही प्रशासनाने स्वीकारला़ तेव्हापासून हे केंद्र बंद पडले आहे़ युवक केंद्र कधी सुरू होणार, याबाबत विचारणा करतात़ परंतु, त्यांना त्याचे उत्तर महापालिकेकडून अद्याप मिळालेले नाही़
सभागृहाला अधिका-यांनी फसविले
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर महापालिका प्रशासनाने केंद्र सद्य स्थितीत सुरू आहे असे उत्तर दिले़ त्यामुळे सभागृहात प्रश्न चर्चेला आला नाही़ महापालिकेच्या अधिकाºयांनी नगरकरांसह विधानसभेच्या सभागृहाची फसवणूक केल्याचे यावरून उघड झाले आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या प्रशासनाने केंद्र सुरू असल्याची माहिती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
शहरासह ग्रामीण भागातील युवकांची गरज लक्षात घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्रासाठीच्या निधीची मागणी केली़ त्यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून सुरुवातीला ९० लाखांचा निधी मंजूर केला़ त्यानंतर पुन्हा या इमारतीसाठी निधी आला़ या निधीतून इमारत उभी राहिली़ परंतु, महापालिका प्रशासनाच्या नाठाळ धोरणामुळे एकमेव आदर्श प्रकल्प बंद पडला़ याचा जाब महापालिकेला विचारणार आहे़ -विनीत पाऊलबुधे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस