महाराजांचे दर्शन घेऊन अश्वाने सोडला प्राण
By Admin | Published: May 16, 2016 11:18 PM2016-05-16T23:18:29+5:302016-05-16T23:25:32+5:30
श्रीगोंदा : येथील ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या नारायण अश्वाने रविवारी रात्री अकरा वाजता तबेल्यातील संत शेख महंमद महाराज यांच्या फोटोचे
श्रीगोंदा : येथील ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या नारायण अश्वाने रविवारी रात्री अकरा वाजता तबेल्यातील संत शेख महंमद महाराज यांच्या फोटोचे दर्शन घेतल्यानंतर बंडू दहातोंडे यांच्या समक्ष प्राण सोडले़ सोमवारी सकाळी श्रीगोंदा शहरातून नारायण अश्वाची अंत्ययात्रा काढून अखेरचा निरोप देण्यात आला़
संत शेख महंमद महाराज यांची पालखी वाहण्यासाठी यात्रा कमिटीने पंढरपूरच्या बाजारातून २३ वर्षांपूर्वी या नारायण अश्वाची खरेदी केली होती़ तेव्हापासून शेख महंमद महाराज यांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत हा अश्व महाराजांचा वाहक असायचा़
गेल्या तीन वर्षांपासून हा अश्व थकला होता़ त्यामुळे तबेल्यात असताना बंडू दहातोंडे यांनी त्या अश्वाची सेवा केली़ चार दिवसांपासून नारायणने अन्न, पाणी वर्ज्य केले होते़ रविवारी रात्री नारायण उठला, तबेल्यातील शेख महंमद महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि तबेल्याबाहेर येऊन प्राण सोडले़ हा घटनाक्रम पाहणाऱ्या दहातोंडे परिवाराला अश्रू अनावर झाले़
सोमवारी सकाळी नारायण अश्वाची श्रीगोंदा शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.हरिनामाच्या जयघोषात ही अंत्ययात्रा संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरासमोर आली असता, नारायणच्या शवावर फुलांची चादर चढवून अखरेचा निरोप देण्यात आला़
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, गोपाळराव मोटे, अशोक आळेकर, आमीन शेख, एम़ डी़ शिंदे, बापूराव गोरे, संजय आनंदकर आदी उपस्थित होते़
(तालुका प्रतिनिधी)