प्रशांत बंब -राजेंद्र पिपाडा बनले व्याही; साध्या पध्दतीने केला विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:17 PM2020-01-14T18:17:41+5:302020-01-14T18:19:17+5:30
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती आणि राहाता येथील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे चिरंजीव निखील यांचा एक आगळा-वेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथे शनिवारी रात्री झाला.
अहमदनगर : गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती आणि राहाता येथील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे चिरंजीव निखील यांचा एक आगळा-वेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथे शनिवारी रात्री झाला. पिपाडा यांचे कुटुंबीय सकाळी मुलगी बघायला गेले व सायंकाळी वधुलाच घरी घेऊन आले. कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने व अवास्तव खर्चाला फाटा देत एकाच दिवसात व मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. श्रीमंत असलेल्या बंब आणि पिपाडा यांच्या या साधेपणाने मात्र सर्वांनाच जिंकले.
राजेंद्र पिपाडा हे शनिवारी सकाळी कुटुंबियांसह मुलगी पाहण्यास गेले. तेथे मुलाला व कुटुंबियांना मुलगी पसंत पडली. त्यानंतर साखरपुडा, लग्न आदी चर्चा झाली. यावेळी आमदार बंब यांनी विवाह साधेपणाने आणि आजच करण्याचा प्रस्ताव पिपाडा यांच्यासमोर ठेवला. पिपाडा यांनी त्यांचे नातेवाईक व मित्रांशी चर्चा केली. त्यांनाही बंब यांचा प्रस्ताव आवडला. बंब यांनीही आहे त्या परिस्थितीत विवाह लावण्याची तयारी सुरू केली. दोघांनीही त्यांच्या मोजक्या नातेवाईक, आप्तेष्टांना विवाहाचे निमंत्रण दिले आणि शनिवारी लासूर स्टेशन येथील एका लॉनवर साध्या पद्धतीने विवाह पार पडला. विवाह समारंभात कोणताही बडेजाव नव्हता की पाहुण्यांची गर्दी. अत्यंत साधेपणाने झालेल्या या विवाह सोहळ््याची चर्चा काही वेळातच सोशल मीडियावरही गेली. बंब-पिपाडा यांच्या या आदर्श पद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले. याचवेळी पिपाडा यांनी थेट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या विवाहाची माहिती दिली. त्यांनी नवदाम्पत्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. पिपाडा, बंब यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांना माहिती दिली. तेही जवळपास असल्याने त्यांनीही या साध्या पद्धतीने होत असलेल्या विवाह समारंभास हजेरी लावली. दोघांचेही त्यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे बंब हे स्वत: अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचे आवाहन करतात. त्याचे अनुकरण स्वत: करूनही त्यांनी समाजासमोर आदर्श पायंडा पाडला आहे. भारतीय जैन संघटनेनेही या साधेपणाचे कौतुक करून समाजानेही आदर्श घेण्याचे आवाहन केले.