प्रवरा, मुळा नदीवरील पुलाचे चिरेबंदी चिरे आजही भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:05 AM2019-09-15T11:05:33+5:302019-09-15T11:05:41+5:30
प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे. दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे.
हेमंत आवारी
अकोले : प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे. दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे. छणीटाकाने घडविलेल्या दगडांचा ‘जडत्व आणि गुरूत्वीयबल’असा शास्त्रशुध्द मेळ घालत यापुलांची निर्मिती झाली आहे.
तालुक्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कळस येथील दगडी पूल काल परवापर्यंत वाहतुकीचा बोजा सोसत होता. कळस, कोतूळ, भंडारदरा, केळुंगन, ब्राम्हणवाडा, पाडाळणे, भोजदरी, विठे घाट, पानओढा, औरंगपूर येथे दगडी कमानीचे छोटे पूल होते. आता त्या ठिकाणी थोडा बदल करण्यात आला आहे.
फुलोत्सवाचे गीत गाणा-या कोंदनशिल्प हरिश्चंद्रगडावर बंगला बांधला होता. या दगडी बंगल्यात शौचालय देखील होते. याची साक्ष भग्न अवशेष देत आहेत. दुर्गम कुमशेतजवळ ‘जॉन’नावाच्या अधिका-याने जायनावाडी येथे बांधलेला बंगला आजही ठणठणीत असून पर्यटक आवर्जून हा बंगला पाहण्यासाठी येतात.
या बंगल्याचा एकही चीरा निखळलेला नाही. फोफसंडी येथील इंग्रजकाळातील बंगला मोडकळीस आला आहे.तालुक्यातील डाक बंगले, नाव बंगले आजही डागडूजी करुन सुस्थितीत आहेत. वास्तुशास्त्राचा आधार घेत तयार झालेले लाकडी चौमोळी बारी, वाकी, अकोले, पांगरी, ब्राम्हणवाडा, कोतूळ, समशेरपूर येथील शासकीय विश्रामगृहे उभी आहेत. उत्कृष्ट वास्तुशिल्पाचे हे नमूने असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुणावत आहेत. बांधकामाची मुदत संपल्याची माहिती इंग्रज सरकारकडून कळविली जाते. यावरुन त्यांनी जतन केलेल्या अभिलेखांची महती मिळते.