‘प्रवरा’ने सहकारासह सामाजिक बांधिलकी जपली
By Admin | Published: August 10, 2014 11:15 PM2014-08-10T23:15:12+5:302014-08-10T23:27:38+5:30
प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे.
बाभळेश्वर : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभे राहिलेले प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे. साहित्यिकांबरोबरच राज्य सरकारनेही सामाजिक बांधिलकीने घेतलेल्या निर्णयामुळे सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११४ व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून देण्यात येणारे साहित्य आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार डॉ. म. सु. पाटील यांना, तर कलागौरव पुरस्कार मोमिन कौठेकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार भारत सासणे, समाजप्रबोधन पुरस्कार महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुदर्शन दहातोंडे, नाट्यसेवा पुरस्कार अनिल क्षीरसागर यांना मुख्यमंत्री चव्हाण आणि फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विखे पाटलांनी सुरू केलेल्या सहकारी कारखानदारीचा आदर्श राज्यातील इतरांनी घेतला. साखर कारखानदारीबरोबरच शैक्षणिक संकुले उभी राहिल्याने या भागाचा विकास झाला. पद्मश्री विखे पाटलांनी ग्रामीण भागाचे आर्थिक नेतृत्व केले. त्यांची ही परंपरा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी चालू ठेवली व आता ती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे चालवत आहेत, असे सांगत मंत्री विखे यांच्यामुळे कृषी व पणन खात्याला योग्य दिशा व नेतृत्व मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कामगार, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, शिक्षण सेवक यांच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले की, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा. पाऊस नसल्याने खरीप वाया गेला असून, रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
फ. मु. शिंदे यांनी एकमेकांचे दु:ख वाहून घेणे हा साहित्याचा धर्म असल्याचे सांगत कवितेच्या माध्यमातून राजकारणी व समाजकारणी कसे असतात याबाबत मार्मिक विवेचन केले. (वार्ताहर)