प्रवरा मेडिकल ट्रस्ट सहा दिवसात उभारणार कोरोनासाठी नवीन हॉस्पिटल; १०० खाटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:08 PM2020-03-30T16:08:13+5:302020-03-30T16:09:15+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला पाहिजे, या हेतूने प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ हे लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त १०० खाटांचे हॉस्पिटल पुढील सहा दिवसात स्थापन करीत आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी कुलपती डॉ.राजेंद्र विखे यांनी दिली.
लोणी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला पाहिजे, या हेतूने प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ हे लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त १०० खाटांचे हॉस्पिटल पुढील सहा दिवसात स्थापन करीत आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांनी दिली.
प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस गेली ४५ वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सुरु केलेले हे रुग्णालय नंतरच्या कालखंडात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी गरीब माणूस केंद्रबिंदू ठेवून चालवून त्याला आधुनिकतेची जोड दिली. हे रुग्णालय नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड तसेच इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे कार्य करते. देशात ग्रामीण भागात सेवा देणारी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे एकमेव रुग्णालय म्हणून प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. सामाजिक बांधिलकीतून आपण हे ‘कोविड-१९’ हॉस्पिटलचा उपक्रम राबवित आहोत, असेही विखे यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज हे उपस्थित होते.
या कोरोना-१९ रुग्णालयात जनरल वॉर्ड, आय. सी. यू, लहान मुलांकरिता स्वतंत्र वॉर्ड तयार करत आहे. रुग्णालयात आवश्यक आॅक्सीजन लाईन, एअर कंडिशनिंग, तसेच सक्शनची सुविधाही संस्था तयार करीत आहे. पुढील सहा दिवसात हे रुग्णालय उभे राहील. पण यासाठी लागणारे तंत्रज्ञान व आयसीयू इतर उपकरणे नवीन लॅब, लॅबरोटरी यासाठी अंदाजे ९ कोटी रुपये खर्च येईल. या कामात प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टरसह पाचशे लोकांचा स्टाफ लागेल, असेही विखे यांनी सांगितले.
अभिमत विद्यापीठ खर्चाचा भार उचलणार
हॉस्पिटलचा बराच खर्च प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा अभिमत विद्यापीठ उचलणार आहे, पण या कार्यात राज्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, संस्था यांनी पुढे येऊन आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात तंत्रज्ञान, मेडिसीन, संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लागणारे मास्क, सूट, इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात मदत केली तर आपल्या सहयोगातून देशावर आलेल्या संकटात काही खारीचा वाटा आपण उचलण्यासाठी मदत होईल, असे आवाहन डॉ. विखे यांनी केले.