निवडणुकीचे पूर्वरंग : दोन्ही काँग्रेसचे ‘हंगामी’ राजकारण

By सुधीर लंके | Published: December 23, 2018 10:05 AM2018-12-23T10:05:55+5:302018-12-23T10:06:52+5:30

निवडणूक आली की उमेदवार शोधायचा ही काँग्रेसी परंपरा याहीवेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कायम आहे.

Pre-election: The 'seasonal' politics of both the Congress | निवडणुकीचे पूर्वरंग : दोन्ही काँग्रेसचे ‘हंगामी’ राजकारण

निवडणुकीचे पूर्वरंग : दोन्ही काँग्रेसचे ‘हंगामी’ राजकारण

सुधीर लंके
निवडणूक आली की उमेदवार शोधायचा ही काँग्रेसी परंपरा याहीवेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कायम आहे. निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना दोन्ही काँग्रेसपैकी निवडणूक कोण लढणार? हेच निश्चित नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपने या मतदारसंघात फायदा उठविलेला दिसतो. यावेळी मात्र, भाजपची वाटही बिकट दिसते.
अहमदनगर मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यु. आर. भागवत, आर. के. खाडीलकर, मोतीलाल फिरोदिया, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान आठरे पाटील, यशवंतराव गडाख, दादापाटील शेळके, बाळासाहेब विखे यांनी येथे खासदारकी भूषविली. राष्टÑवादीकडून तुकाराम गडाख यांना एकदा संधी मिळाली. दिलीप गांधी यांच्या रुपाने सध्या भाजपचा खासदार आहे. २००४ चा अपवाद सोडता ते सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत.
शिवसेना-भाजपमागे राज्यात ओबीसी व विस्थापितांच्या विरोधातील मतांची एक मोठी व्होट बँक आहे. अहमदनगर मतदारसंघातही भाजपला याच धोरणाचा फायदा झाला. १९९८ पर्यंत या मतदारसंघात सेना-भाजपला शिरकाव करता आला नव्हता. १९९८-९९ मध्ये बाळासाहेब विखे सेनेच्या तिकिटावर खासदार झाले. १९९९ च्या निवडणुकीत दिलीप गांधी यांच्या रुपाने कमळ फुलले. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दादापाटील शेळके व काँग्रेसचे बाबासाहेब भोस या दोघांच्या मतविभागणीने गांधी यांना संसदेत पाठविले. २००४ मध्ये भाजप व राष्टÑवादी यांच्यात सरळ लढत झाली. तेव्हा भाजपचे ना. स. फरांदे पराभूत होऊन तुकाराम गडाख खासदार झाले. २००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादीत बंडखोरी होऊन शिवाजी कर्डिले व राजीव राजळे हे आमनेसामने आले. त्या मतविभागणीत गांधी विजयी झाले. म्हणजे दोन्ही काँग्रेसमध्ये जेव्हा बिघाडी अथवा बंडखोरी झाली तेव्हा भाजपला फायदा झाला आहे.
२०१४ मध्ये भाजप व राष्टÑवादी यांच्यात एकास एक लढत होती. मात्र, त्यावेळी मोदी लाट भाजपच्या मदतीला आली. आगाऊ निवडणुकीसाठी गांधी पुन्हा तयारी करत आहेत. नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांना पक्षातूनच विरोध आहे. गांधी यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचेच अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. नगर महापालिकेत गांधी यांना मोठे अपयश आल्यानेही त्यांची चिंता वाढली आहे. अर्थात गांधी ऐनवेळी दिल्लीत बाजी मारतात, हे आजवर दिसले. भाजपकडून उमेदवारीसाठी पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, भानुदास बेरड यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, शिंदे स्वत:चा हक्काचा मतदारसंघ सोडून लोकसभा लढण्याचे धाडस करतील असे दिसत नाही. खासदारकीच्या दृष्टीने त्यांची बांधणी नाही. भाजप ऐनवेळी नवीन चेहराही आणू शकतो. युती न साकारल्यास शिवसेनेकडून घनश्याम शेलार यांचीही तयारी सुरु आहे.
नेहमीप्रमाणे राष्टÑवादीकडून उमेदवारीचा चेहरा अद्यापही ठरला नाही.
हगाम्यात हलगी घुमली की पैलवानाला कपडे काढायला लावायचे, असे राष्टÑवादीचे नेहमीचे धोरण असते. यावेळी पक्षाने आमदार अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा केली. मात्र, जगतापांच्या गोटात शांतता आहे. नरेंद्र घुले, प्रशांत गडाख याही नावांची चर्चा होते. मात्र, तशीही शक्यता कमी दिसते. प्रताप ढाकणे स्वत: तयार आहेत. मात्र, पक्षाकडून त्यांना हिरवा कंदील नाही. राष्टÑवादीही अन्य क्षेत्रातील काही मान्यवरांना गळ घालत असल्याचे समजते. त्यामुळे पक्षाबाहेरुनही उमेदवार येऊ शकतो.
राष्टÑवादी-विखे संघर्ष की आघाडी?
राष्ट्रवादीसमोर नेहमी बंडखोरीची डोकेदुखी राहिली. याहीवेळी त्यांच्यासमोर विखे यांचे आव्हान आहे. सुजय विखे हे स्वत: उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी त्यांची मागणी आहे. मतदारसंघ कॉंग्रेसला न सोडल्यास आपण राष्टÑवादीसह कुठल्याही पक्षाचे तिकीट घेऊ. प्रसंगी अपक्ष लढू. पण उमेदवारी करुच, अशी घोषणा सुजय यांनी केली आहे. ते थांबतील अशी शक्यता नाही. त्यामुळे एकतर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणे किंवा विखेंशी लढण्याची तयारी ठेवणे हे दोन पर्याय राष्टÑवादीसमोर आहेत. शरद पवार व विखे यांच्यात सख्य नसल्याने पवार हे विखे यांचे म्हणणे ऐकतील का? याबाबतही साशंकता आहे. राष्ट्रवादीने मतदारसंघ न सोडल्यास विखे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यातून राष्टÑवादी व विखे हा संघर्ष सुरु होईल. त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजप पुन्हा एकदा करेल.
शिर्डी-नगरमध्ये साम्य
निवडणुकीचा हंगाम सुरु झाला की उमेदवार ठरवायचे असे ‘शिर्डी’ मतदारसंघाबाबतचे दोन्ही काँग्रेसचे धोरण ‘अहमदनगर’ मतदासंघातही दिसते. त्यामुळे नेते घडण्याची प्रक्रियाच बंद झाली आहे.‘पैसे ओता व ऐनवेळी निवडणुका लढवा’ अशी नवी निती आकाराला येत आहे. निष्ठावान कार्यकर्ते व सामान्य लोक निवडणुकांपासून दूर फेकले जात आहेत.

Web Title: Pre-election: The 'seasonal' politics of both the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.