कर्जतच्या लाडक्या लेकीची हेलिकॉप्टरमधून बिदाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:16 PM2018-02-12T12:16:44+5:302018-02-12T12:17:09+5:30
हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय कर्जतकरांना रविवारी आला. विवाहानंतर पित्याने लाडक्या लेकीला निरोप देताना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविले. ही बिदाई कर्जतकरांनी डोळे भरून पाहिली.
कर्जत : हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय कर्जतकरांना रविवारी आला. विवाहानंतर पित्याने लाडक्या लेकीला निरोप देताना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविले. ही बिदाई कर्जतकरांनी डोळे भरून पाहिली.
कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तारेक सय्यद यांची कन्या मिसबा हिचा विवाह बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील मोहंमद अयाज यांच्याशी रविवारी झाला. नवरी मुलीला सासरी पाठविण्यासाठी चार चाकी गाडी सजवून वाजत गाजत निरोप दिला जातो. मात्र कर्जतकरांनी रविवारी वेगळाच अनुभव घेतला. वधू पिता तारेक सय्यद यांनी आपल्या लाडक्या लेकीला थेट हेलिकॉॅप्टरमधून निरोप दिला. पुणे येथून मागविण्यात आलेले हे खासगी हेलिकॉप्टर कर्जतकरांचे आकर्षण ठरले. या विवाह समारंभाला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचीही उपस्थिती होती.
दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानावर या नवदांपत्यास कर्जतकरांनी निरोप दिला. यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, सामाजिक कार्यकर्त्या भामाबाई राऊत, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, माजी सरपंच संतोष म्हेत्रे, कर्जत मेट्रोचे अध्यक्ष राहुल सोनमाळी, रज्जाक झारेकरी, अफसार सय्यद, अफताब सय्यद व मान्यवर उपस्थित होते.
समाजात मुलींविषयी चुकीचा गैरसमज निर्माण झाला आहे. अनेकांना मुली नकोशा वाटत आहेत, हे चुकीचे आहे. समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे. आई, वडिलांच्या दृष्टीने मुलगी व मुलगा हे समानच असावेत, हा संदेश जाण्यासाठी मुलीची हौस केली.
-तारेक सय्यद, वधू पिता