गर्भगिरीतील करवंदे, जांभूळ झाडावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:55+5:302021-05-31T04:16:55+5:30
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मायंबा, वृद्धेश्वर, मढी धामणगाव देवीचे, सावरगाव पट्ट्यातील गर्भगिरीत वसंतोत्सव सरतीनंतर करवंदे, जांभळाचा दरवळ सुरू ...
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मायंबा, वृद्धेश्वर, मढी धामणगाव देवीचे, सावरगाव पट्ट्यातील गर्भगिरीत वसंतोत्सव सरतीनंतर करवंदे, जांभळाचा दरवळ सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व बाजारपेठा बंदमुळे गर्भगिरीतील हा रानमेवा झाडांवरच लटकत असल्याचे चित्र आहे.
येथील करवंदांच्या जाळीत व जांभळांच्या झाडांखाली मोठ्या प्रमाणात पक्व फळे खाली गळून अक्षरश: सडा पडला होता. चारचाकी वाहनातून आलेले काही जण मात्र सुगंधाचा दरवळ शोधीत थेट दरीत जाऊन या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसून आले. तीसगावसह पाथर्डीच्या बाजारात या रानमेव्याला मोठी मागणी असते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीर व महामारीचे भीतीने सलग दुसऱ्या वर्षी हा चोखंदळ ग्राहक या रानमेव्याच्या चवीला पारखा ठरला आहे. आंबे पाडी लागले, वसंतोत्सवाची चाहूल लागली की, गर्भगिरीत या रानमेव्याच्या दरवळास आरंभ होतो. जांभूळ व करवंदे ही दोन्ही रानफळे मधुमेहासाठी रामबाण औषधी असल्याची वदंता आहे. तुरळक प्रमाणात कोणी फेरीवाले तीसगाव शहरात आले. तरी ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याचे अजय पाठक यांनी सांगितले.
---
बिबट्याचीही भीती
मायंबा घाटातील रानमेवा यावर्षी अधिक चवदार असल्याची पुष्टी बाबासाहेब चितळे, सीमा चितळे यांनी दिली. काही प्रमाणात अजूनही असलेल्या बिबट्याच्या भीतीने स्थानिक रहिवासी व गुराखी अजूनही गर्भगिरीत जातच नसल्याचे बाबासाहेब म्हस्के म्हणाले.
----
फोटो आहेत