क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:08 AM2020-05-17T11:08:31+5:302020-05-17T11:09:14+5:30

मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली.

A pregnant woman in the police force changed the look of the school in quarantine | क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे

क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे

बाळासाहेब काकडे  । 
श्रीगोंदा : मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली. क्वारंटाईन काळात त्या महिलेने केलेल्या कामाचे ग्रामस्थ, शिक्षकांनी कौतुक केले आहे.
रेखा दीपक ढवळे या मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल आहेत. त्यांचे पती दीपक बाळासाहेब ढवळे मुंबईत भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रेखा ढवळे यांनी गरोदरपणाचा आठवा महिना संपल्यानंतर बाळंतपणासाठी रजा घेतली. त्या पतीसोबत गावी बेलवंडी येथे परतल्या. कुटुंबाच्या व गावाच्या हितासाठी घरी न जाता त्या श्रीकृष्ण मळ्यातील शाळेत क्वारंटाईन झाल्या. या काळातही त्यांनी आराम न करता सामाजिक जाणीवेतून पतीच्या मदतीने शाळेचे रूपडे पालटायचे ठरविले. त्यांनी तेथे आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली. सुट्टीत शाळेसमोर साचलेला कचरा, वाळलेली पाने, धूळ साचलेल्या भिंती, पडवीतला कचरा काढण्याचे काम सुरू केले. शाळा व परिसर स्वच्छ केला. शाळा परिसरात लावलेल्या झाडांना वाफे तयार करून सुकलेल्या झाडांना पाणी सोडले. असे एक नाही, तर सलग पंधरा दिवस त्यांचा नित्यक्रम सुरू होता. त्यामुळे झाडे पूर्वीसारखी टवटवीत झाली. झाडे बहरून गेली. तेथे पक्षीही येऊ लागले. त्यांचा किलबिलाट सुरू झाला. पक्ष्यांना पाण्यासाठी जागोजागी झाडावर पाण्यासाठी ग्लास बांधले. बाहेरून आलेले नागरिक सहजरित्या क्वारंटाईन होत नाहीत. अशा स्थितीत ढवळे दाम्पत्य स्वत:हून क्वारंटाईन झाले. रेखा ढवळे यांनी गर्भवती असतानाही केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. 
दिलगिरी अन् सलाम..
गर्भवती असूनही रेखा ढवळे या शाळेत क्वारंटाईन झाल्या. त्याबद्दल कोरोना ग्राम समितीच्या सदस्यांनी ढवळे यांचा शाळेत जाऊन सत्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. ढवळे दाम्पत्याने क्वारंटाईन काळात शाळेत केलेले काम पाहून मुख्याध्यापिका छबाबाई जाधव, सहशिक्षिका मोरे  यांनी त्यांना सलाम केला. 

Web Title: A pregnant woman in the police force changed the look of the school in quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.