राहुरीत पोलीस स्टेशनच्या आवारात व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:43 PM2018-07-25T15:43:34+5:302018-07-25T15:44:07+5:30
ताहराबाद येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर विधाटे यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
राहुरी : ताहराबाद येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर विधाटे यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी यासंदर्भात जिओच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविले असून भरपाई संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
गंगाधर विधाटे हे रॉकेलची बाटली व काडीपेटी घेऊन बुधवारी दुपारी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात आले. तहसील व पोलीस खात्याला निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप करीत अंगावर रॉकेल टाकले़ काडी पेटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच समोर असलेल्या पोलिसांनी त्याला रोखले़ विधाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘लोकमत’शी बोलतांना विधाटे यांनी सांगितले की, ताहाराबाद येथे माझे हॉटेल व घर आहे. शेतातून जिओ कंपनीची लाईन गेली आहे. पोकलँडच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हॉटेल व घराला तडे जाऊन नुकसान झाले आहे. जिओ कंपनीने नुकसान भरपाई द्यावी म्हणून कंपनीकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे टाळले. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र मला न्याय मिळाला नाही़ त्यामुळे मी पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला़ जिओ कंपनीने माझे झालेले नुकसान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
गंगाधर विधाटे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे. पंचनामा करण्यात आला असून जिओ या खासगी कंपनीच्या अधिका-यांना भरपाई देण्यासंदर्भात सांगितले आहे. जिओ कंपनीच्या अधिका-यांची बैठक बोलविली आहे. कंपनीचे अधिकारी दप्तर घेऊन येणार असून कंपनी जबाबदार असून त्यांनी भरपाई द्यायची आहे. -अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी