सिद्धटेकला गणेशोत्सवाची तयारी
By Admin | Published: August 26, 2014 11:20 PM2014-08-26T23:20:33+5:302014-08-26T23:21:05+5:30
कुळधरण : अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
कुळधरण : अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
राज्यभरातून लाखो भाविक अष्टविनायकांचे दर्शनासाठी गर्दी करतात. भीमा नदीच्या किनारी वसलेल्या सिद्धटेकच्या विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रेलचेल असते. मंदिर व्यवस्थापनाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध महापूजेचे आयोजन करण्यात येते. सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीला भीमास्नान घालण्यात आले. मंगळवारपासून श्री सिद्धीविनायकाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चतुर्थीपर्यत हा सोहळा सुरू राहणार आहे. रोज सायंकाळी श्री ची पालखी नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात आणण्यात येते. पालखी उत्सवात ग्रामस्थ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पालखी सोहळ्यात ग्रामस्थ, बाळगोपाळ पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतात. यात रेवड्यांची उधळण केली जाते. ‘बाप्पा मोरया’च्या गजरात पालखी उत्सव सुरू असतो. रात्री मोरया गोसावीरचित पदांचे गायन होते.
गणेशोत्सवादरम्यान सिद्धी विनायकाला प्रात:कालीन पूजेनंतर पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात येते. यावेळी श्रीगणेशाला नानाविध अलंकाराने सजविले जाते. हिरे-रत्नजडित सुवर्णालंकारांचा यामध्ये समावेश असतो. गणेश जन्माचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप होते. गावात सार्वजनिक गणपती बसविले जात नाहीत. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीच्या सुविधा
सिद्धटेकच्या विविध विकास कामांचा नियमित पाठपुरावा केला जातो. सध्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, अशा सुविधा ग्रामपंचायतीकडून पुरविल्या जात आहेत. गणेशोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.