दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले
By शेखर पानसरे | Published: July 16, 2023 01:29 PM2023-07-16T13:29:36+5:302023-07-16T13:29:39+5:30
रात्री वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संगमनेर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील चौघांना संगमनेर शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील एक जण पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांची अधिक चौकशी केली असता, त्यात तीन विधिसंघर्षीत बालकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि.१५) रात्री २.१५ च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील समनापूर चौफुली पुणे बायपास रस्त्याला ही कारवाई करण्यात आली.
गणेश चंद्रभान गायकवाड (वय २३, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे तर रविंद्र राधाकिसन डेंगळे असे पळून गेलेल्याचे नाव आहे. पकडलेल्या चौघांकडून छऱ्याची बंदूक, गज, गलोल, मिरचीपूड, लाकडी दांडा, स्क्रू ड्रायव्हर, विना क्रमाकांच्या दोन दुचाक्या असा एकूण १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. रात्री वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.