श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून प्रारंभ, रथाला पितळी कलश

By शिवाजी पवार | Published: March 29, 2023 06:49 PM2023-03-29T18:49:15+5:302023-03-29T18:50:13+5:30

शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्रीराम नवमी यात्रोत्सवास ३० मार्चला सुरुवात होत आहे.

Preparations for Srirampur's Ramnavmi Yatra Festival will begin tomorrow | श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून प्रारंभ, रथाला पितळी कलश

श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून प्रारंभ, रथाला पितळी कलश

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्रीराम नवमी यात्रोत्सवास ३० मार्चला सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची श्रीराम नवमी यात्रा समितीच्या वतीने जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उरूसापाठोपाठ साजरा होणार्या श्रीराम नवमीची यात्रा ही येथील सामाजिक सलोख्याचे प्रतिक मानली जाते.

यात्रेकरिता राज्यातील विविध भागातून छोटे मोठे व्यावसायिक, रहाट पाळणे त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यादृष्टीने यात्रोत्सव मोठ्या आनंदाने व शांततेत पार पडावा, याकरिता यात्रा उत्सव समिती प्रयत्न करीत आहे.

यानिमित्त श्रीराम जन्मोत्सव तसेच भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सायंकाळी ६ वाजता रथातून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. शहरातील कालव्याजवळ फटाक्यांची आतषबाजी व शोभेचे दारूकाम केले जाणार आहे. यावर्षी रथाचे नवीन रंगकाम सुरू असून, त्यावर पितळी कलश बसविण्यात येणार आहे. तसेच मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यात्रा उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी ७ वाजता शनिदेवाची यात्रा व प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी देशातील प्रसिद्ध मल्लांचा कुस्त्यांचा हंगाम दरवर्षीप्रमाणे होणार असून, त्या निमित्ताने नामांकित मल्ल दाखल होणार आहेत.

विजेत्या मल्लांना आशिष बोरावके यांच्या वतीने त्यांचे वडील अण्णासाहेब बोरावके यांच्या स्मरणार्थ व प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र बाळाराम महाराज उपाध्ये यांच्या स्मरणार्थ उपाध्ये परिवाराच्या वतीने व नगरपालिकेच्या वतीने सुवर्णपदक दिले जाते.

श्रीराम नवमी यात्रा उत्सवासाठी शहरातील व परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक संस्था, लोकप्रतिनिधी, श्रीराम मंदिर ट्रस्ट व शहरवासीयांचे मोठे योगदान लाभत असल्याचे यात्रा समितीने म्हटले आहे.

Web Title: Preparations for Srirampur's Ramnavmi Yatra Festival will begin tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.