माध्यमिकपेक्षा प्राथमिकची उपस्थिती सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:11+5:302021-02-10T04:20:11+5:30
अहमदनगर : कोरोनानंतर शाळा पूर्वपदावर येत असून नगर जिल्ह्यात आतापर्यंत प्राथमिक शाळांतील उपस्थिती ५० टक्के, तर माध्यमिक शाळांची उपस्थिती ...
अहमदनगर : कोरोनानंतर शाळा पूर्वपदावर येत असून नगर जिल्ह्यात आतापर्यंत प्राथमिक शाळांतील उपस्थिती ५० टक्के, तर माध्यमिक शाळांची उपस्थिती ४० टक्के झाली आहे. परिणामी माध्यमिकपेक्षा प्राथमिक शाळांतील उपस्थिती सरस ठरत आहे.
कोरोनाची स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी, तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यादृष्टीने नगर जिल्ह्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे नियोजन केले.
शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी प्रथम पालकांचे संमतीपत्र गरजेचे आहे. शाळेत सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग उपलब्ध करून विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, शाळा ११ ते २ अशी तीन तासच दररोज भरावी, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत एकूण १२०९ शाळा असून आतापर्यंत त्यातील ११०९ शाळा सुरू झाल्या आहेत. या वर्गांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १६ हजार ८७७ असून त्यातील १५ हजार ९१७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७३ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह निघाला. दरम्यान या वर्गात एकूण २ लाख ८४ हजार ३५४ विद्यार्थी असून त्यातील १ लाख १४ हजार ९२८ विद्यार्थ्यांची (४० टक्के) हजेरी सध्या आहे. या वर्गांसाठी १ लाख ३२ हजार २२९ पालकांनी संमतीपत्र दिले आहेत.
पाचवी ते आठवीच्या नगर जिल्ह्यात २००३ शाळा असून त्यातील १९६२ शाळा सुरू झाल्या आहेत. या वर्गात शिक्षकांची संख्या ६ हजार ६१४ असून त्यातील ६ हजार ४२१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २७ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळले. दरम्यान, या वर्गांत एकूण ३ लाख ५ हजार ७७३ विद्यार्थी असून त्यातील १ लाख ५४ हजार ८७२ विद्यार्थी (५० टक्के) सध्या हजर आहेत. या वर्गांसाठी १ लाख ६९ हजार पालकांनी संमतीपत्र दिले आहेत.
----------
विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांसोबत आता सॅनिटायझर
विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तके, पाण्याच्या बाटलीसोबत आता सॅनिटायझरची बाटली विद्यार्थ्यांना पालक देत आहेत. विद्यार्थीही न चुकता सॅनिटायझर शाळेत नेऊन त्याचा वेळोवेळी वापर करत असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शाळेतही सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात आहे.
------------
फोटो - ०९स्कूल