भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:43+5:302021-09-11T04:22:43+5:30
भंडारदरा परिसरात पाहिजे तितका व वेळेत पाऊस न पडल्याने भात खाचरे कोरडी झाली होती, परंतु पडणाऱ्या पावसाने भात पिके ...
भंडारदरा परिसरात पाहिजे तितका व वेळेत पाऊस न पडल्याने भात खाचरे कोरडी झाली होती, परंतु पडणाऱ्या पावसाने भात पिके टवटवीत दिसत आहेत. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे भात पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी भात पिकावर अळी पडल्या होत्या, परंतु जोरात पडणाऱ्या पावसाने आळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भंडारदरा धरण हे आतापर्यंत ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो होत होते. परंतु ह्या वर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. अजून भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. मागील दोन-तीन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. असाच पाऊस असल्यास दोन-तीन दिवसांत भंडारदरा धरण भरेल.
मागील २४ तासात धरणाच्या जलाशयात २१९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. शुक्रवारपर्यत धरणाचा जलसाठा ९९३३ दशलक्षघनफूट इतका झाला आहे. आज सकाळी भंडारदरा येथे ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटघर ७० मि.मी., पांजरे ६९ मि.मी., वाकी ४१ मि.मी. तर रतनवाडी येथे १५६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.