कोपरगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:27+5:302021-02-20T04:57:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी ( दि.१८ ) रात्री आठ वाजेच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी ( दि.१८ ) रात्री आठ वाजेच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाल्याने वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सर्वत्र साधारण एक ते दीड तास हजेरी लावली आहे. तहसील कार्यालयात या अवकाळी पावसाची तीन मिमी नोंद झाली आहे.
या पावसाने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील काढणी केलेली तसेच काढणीला आलेली हरभरा, ज्वारी, गहू पिके भिजल्याने तसेच वादळामुळे फळ पिकांचा बहार जमिनीवर गळून पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होऊन काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा काही तास खंडित झाला होता.
कोपरगाव तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू , कांदा, मका व ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी खरिपात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके ही जोमात आहेत. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या पिकांना काहीसा फटका बसला आहे. फळ पिकांचा, आंब्याचा झाडांचा बहार गळून पडला आहे. तर महावितरणचे किरकोळ नुकसान झाले आहे.
.........
वादळामुळे फलक उलथून पडले...
तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालकांच्या अभिनंदनसह राजकीय, शैक्षणिक, बँकांचे, सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांचे शहरासह ग्रामीण भागातील जाहिरात फलक अचानक आलेल्या वादळामुळे उलथून पडले होते.
............
शेतकऱ्यांसह प्रवाशांना दिलासा...
तालुक्यातील दहा गावात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी परिसरातील डंपरमधून मातीची वाहतूक सुरु आहे. ही माती रस्त्यावर पडून धुळीत रूपांतर होऊन शेतकऱ्यांच्या पिकांना व रस्त्यावरील प्रवाशांना प्रचंड त्रास होता. परंतु, अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांच्या पानावर बसलेली धूळ ही धुवून गेल्याने पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. तर रस्त्यावरील धूळ कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे गुरुवारी रात्री या सर्वच रस्त्यांची घसरगुंडी झाली होती.
......