अहमदनगरचे कलावंत करणार न्यूझीलंडमध्ये लावणीचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 06:56 PM2017-10-08T18:56:34+5:302017-10-08T18:58:39+5:30
लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम आता न्यूझीलंडमध्ये घुमणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील राजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राचे ११ कलावंत न्यूझीलंडमध्ये १२ आॅक्टोबरपासून लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम आता न्यूझीलंडमध्ये घुमणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील राजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राचे ११ कलावंत न्यूझीलंडमध्ये १२ आॅक्टोबरपासून लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर करणार आहेत. केंद्र शासनाच्या आयसीसीआर विभागाकडून महाराष्ट्राच्या पारंपारिक लावणीचा कार्यक्रम परदेशात सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यासह देशभरात अहमदनगरच्या लावणी सम्राज्ञी -अभिनेत्री राजश्री आणि आरती काळे यांच्या लावणीला सवार्नीच दाद दिली आहे. आतापर्यत परदेशासह देशतील विविध ठिकाणी त्यांनी लावणीचे कार्यक्रम सादर केले आहेत. याच माध्यमातून त्यांची न्यूझीलंड दौ-यासाठी निवड झाली आहे. राजश्री आणि आरती यांच्यासह ११ कलावंत न्यूझीलंडच्या दोन शहरात लावणी सादर करणार आहेत. तसेच तेथील कलाकारांना लावणीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या दौ-यामध्ये पारंपारिक गण, गौळण, मुजरा, नृत्य, अदाकारीची लावणी, बैठकीचा लावणी, श्रृगांरिक लावणी, छक्कड आणि खंडोबाचे जागरण गीत असा दोन तासांचा लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या दौ-यासाठी राजश्री व आरती या भगिनींसह ढोलकीवादक पांडुरंग घोटकर, कृष्णा मुसळे, हार्मोनियमवादक सुधीर जावळकर, गायिका स्मिता बने, निवेदन नरेंद्र बेडेकर यांच्यासह आरती जावळे, शीतल काळे, रागिणी काळे, राणी काळे यांचा समावेश आहे. यंदाच्या दौ-यापुर्र्वी कालिका कलाकेंद्राच्या टीमने तीन देशांचा दौरा केला आहे. २०१० मध्ये १७ दिवसांसाठी या केंद्राची निवड झाली होती. २०१० मध्ये जपान, रशिया आणि इंडोनेशिया येथे लावणी सादर करण्यात आली. त्यानंतर सात वर्र्षांनी न्यूझीलंड दौ-यासाठी या केंद्राची निवड झाली आहे.
मराठी मातीतील गोडवा आणि सोज्वळतेमुळे परदेशात लावणी प्रसिध्द होत आहे. सरकारने केलेल्या निवडीमुळे आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंड दौ-यामुळे आणखी प्रगल्भता नक्कीच मिळणार आहे. लावणीला मिळणा-या या व्यासपीठामुळे भविष्यात उत्तमोत्तम कलाकार पाहायला मिळतील. अभिनयाला भाषेची गरज नसल्याने हावभाव, नृत्यमुद्रा रसिकांपर्यत पोहोचवण्याची ताकद लावणीमध्ये आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्येसुध्दी लावणी गाजेल असा विश्वास आहे.
- राजश्री व आरती काळे, संचालक, कालिका कला केंद्र, सुपा(अहमदनगर)