नेतृत्त्वासमोर अडचणी मांडल्या; तोडगा निघाल्याची राम शिंदेंची माहिती
By सुदाम देशमुख | Published: March 24, 2024 11:44 PM2024-03-24T23:44:43+5:302024-03-24T23:47:42+5:30
अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अहमदनगर : आमदार प्रा. राम शिंदे यांनी रविवारी रात्री सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे प्रश्न, अडचणी मांडल्या. भाजपाने चारशे पारचा नारा दिल्याने सहकार्याची भूमिका घेत फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पक्षाचे काम करण्याला महत्त्व असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.
अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, नाराजी ही अनेक वर्षांपासूनची होती. याबाबत फडणवीस यांच्याशी सविस्तर, तपशीलवार चर्चा झाली. मी निष्ठावान, घरंदाज कार्यकर्ता असल्याने नेतृत्त्वाने उमेदवारीबाबत घेतलेला निर्णय स्वीकारला आहे. मी प्रमुख दावेदार असूनही डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न, अडचणी होत्या. त्या नेतृत्त्वासमोर मांडल्या. फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली, असे म्हणावे लागेल. आपले कोणीतरी ऐकावे हाच बैठकीमागील उद्देश होता. आता पक्षाने चारशे पारचा नारा दिला आहे. त्यासाठी अहमदनगरमध्ये पक्षाचे काम करणार आहे. दरम्यान या बैठकीला नगर जिल्ह्यातील कोणते नेते उपस्थित होते, याचा तपशील समजू शकला नाही.