राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन; निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली
By साहेबराव नरसाळे | Published: July 7, 2023 05:11 PM2023-07-07T17:11:18+5:302023-07-07T17:11:42+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’चे दर्शन घेतले.
शिर्डी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (दि.७) श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’चे दर्शन घेतले. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली.