कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक : डॉ. नंदकुमार भुते यांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:37 PM2020-07-09T12:37:08+5:302020-07-09T12:38:04+5:30

मका, कपाशीवरील कीड व्यवस्थापनासाठी पिकांची उगवण झाल्यापासूनच प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळणे शक्य होते, असे डॉ. नंदकुमार भुते यांनी सांगितले.

Preventive measures required for pest management: Dr. Interview with Nandkumar Bhute | कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक : डॉ. नंदकुमार भुते यांची मुलाखत

कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक : डॉ. नंदकुमार भुते यांची मुलाखत

गोरख देवकर

अहमदनगर : अगदी वेळेत पाऊस आल्याने खरीप पेरणी चांगली झाली आहे. शेतकºयांनी कपाशी, मका पिकाची लागवडही मोठ्या क्षेत्रावर केली आहे. मात्र काही ठिकाणी मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यावरील उपाय योजनांबाबत महात्मा फुले कृृषी विद्यापीठातील सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.

मका, कपाशीवरील कीड व्यवस्थापनासाठी पिकांची उगवण झाल्यापासूनच प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळणे शक्य होते, असे डॉ. भुते यांनी सांगितले.

प्रश्न : पिकावर कीड नेमकी होते कशी?
डॉ. भुते : उन्हाळ्यामध्ये पीक नसते तेव्हा या अळी (कीड) इतर पर्यायी खाद्यावर किंवा जमिनीत कोषावस्थेत असतात. पावसाचे वातावरण किडींच्या प्रजननासाठी पोषक असते. विशेषत: खरीप हंगामात त्यांचा प्रादुर्भाव अधिक असतो. अमेरिकन लष्करी अळीही ८० पिकांवर आढळते. ती अळी दोन वर्षांपूर्वी विदेशातून आपल्या देशात आली. तिचे आर्युमान ३५ दिवसांचे असते. 

प्रश्न : यावर्षीही मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळू लागला आहे, त्याचे नियंत्रण कसे करावे?

डॉ. भुते : मक्यावरील अळी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन गरजेचे आहे. पिकावरील अंडीपूंज, अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझाडीटॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. मका एक महिन्याची होईपर्यंत एकरी २० पक्षीथांबे उभारावेत. पक्षी त्यावर बसून अळ्या वेचून खातील. एकरी १२ ते १५ कामगंध सापळे लावावेत. पीक रोपावस्थेपासून पोंग्यावस्थेपर्यंत रासायनिक ऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम किंवा मेटारायझिअम अ‍ॅनिसोप्ली ५० ग्रॅम किंवा बॅसिलस युरिंजिएन्सीस २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास स्पिनेटोराम ११.७ टक्के एससी ५ मिली, क्लोरॅन्ट्रॉनिलिप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली यापैकी एकाची फवारणी करावी. मका जनावरांसाठी घेतल्यास रासायनिक फवारणी करू नका.

प्रश्न : गतवर्षी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, इतर किडीचे संकट कसे टाळावे?
डॉ. भुते : कपाशी उगवणीनंतर पहिल्या दोन महिन्याच्या काळात रासायनिक किटकनाशके फवारणी करू नये. त्यामुळे मित्रकिडी नष्ट होतात. सुरुवातीच्या २ ते ३ फवारण्या ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन १०००० पीपीएम १० मिली प्रतिलिटर किंवा १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. पिठ्या ढेकूण, मावा किडीसाठी व्हर्टिसिलीयम लेकॅनी या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

---------------
 पेरणीनंतर महिन्याभराने तुडतुडे, पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी १० ते १५ लावावेत. स्पोडोप्टेटा अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास नोमूरिया रिलाई किंवा मेटारायझीअम अ‍ॅनिसोप्ली या बुरशीची ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.


गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या, गळालेली पाने, बोंडे जमा करून नष्ट करावीत. हेक्टरी २५ ते ३० पक्षीथांबे लावावेत.

Web Title: Preventive measures required for pest management: Dr. Interview with Nandkumar Bhute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.