उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:31 PM2017-11-24T12:31:39+5:302017-11-24T12:40:13+5:30
शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.
राहुरी : शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.
उसाला प्रति टन ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काटा बंद आंदोलन हाती घेतले असून, वांबोरी येथील प्रसाद शुगर फॅक्टरीवर संघटनेने आंदोलन पुकारले आहे. काही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारपासून जिल्हाभर आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रवींद्र मोरे यांनी गुरुवारी केली होती. त्यानुसार त्यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. उसाला ३४०० रूपये प्रति टन भाव मिळाल्याशिवाय गव्हाणीकडे ऊस जाऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्याचा वजन काटा बंद पाडला आहे. आंदोलनाची माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे कारखानास्थळी झाले आहेत. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नगरहून राज्य राखीव दलाची तुकडीही वांबोरीत दाखल झाली आहे. आंदोलनस्थळी संघटनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. दरम्यान तनपुरे यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.