संघर्षाविना मिळणार दाम
By Admin | Published: October 20, 2016 01:03 AM2016-10-20T01:03:59+5:302016-10-20T01:34:37+5:30
भेंडा : कमी पावसामुळे जमिनीतील पाणीे पातळीत झालेली घट व शेतीला कालव्याचे पाणी न मिळाल्याने नेवासा तालुक्यातील ऊस क्षेत्रात ७० टक्क्याने घट झाली आहे
भेंडा : कमी पावसामुळे जमिनीतील पाणीे पातळीत झालेली घट व शेतीला कालव्याचे पाणी न मिळाल्याने नेवासा तालुक्यातील ऊस क्षेत्रात ७० टक्क्याने घट झाली आहे. परिणामी आगामी हंगामात ऊस उत्पादकांना कोणताही संघर्ष न करता चांगला भाव मिळणार आहे.
गेल्या उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. नंतर पाऊस होऊन जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील ऊस पिकात पाणी शिरल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना उसाची विक्री करावी लागली. काही ऊस नवीन लागवडीसाठी वापरला गेल्याने उसाची टंचाई भासणार आहे. नेवासा तालुका उसाचे आगार म्हणून प्रसिध्द होता. येथून शेवगाव, पाथर्डी, राहाता, अकोले, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा होत होता. यंदा ऊस क्षेत्र घटल्याने तालुक्यात आतापर्यंत फक्त १२ हजार हेक्टरवर ऊस लागवड झालेली आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, असा अंदाज आहे.
सध्या ऊस टंचाई असल्याने ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना जो कारखाना एकरकमी चांगला भाव देईल त्या कारखान्यास शेतकरी ऊस देतील यावरुन उसाची पळवा पळवी होईल. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस दराची स्पर्धा करावी लागणार आहे.
गेली काही वर्षांपासून तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऊस पिकाच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे.
(वार्ताहर)