कोविड सेंटरच्या मदतीसाठी सरसावले प्राथमिक शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:09+5:302021-04-16T04:21:09+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरची चांगलीच मदत होत ...
दहिगावने : शेवगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरची चांगलीच मदत होत आहे. या सेंटरला मदत करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी व्हाॅटस्ॲप ग्रुपच्या मदतीने एकाच दिवसात एक लाख रुपयांचा मदत निधी जमा केला.
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मागील वर्षभरापासून व्हॉटस्ॲप ग्रुपचा सकारात्मक वापर करत आहेत. याच ग्रुपच्या माध्यमातून या शिक्षकांनी गुरुवारी शेवगावच्या कोविड केअर सेंटरच्या मदतीसाठी दिवसभरात एक लाख रुपयांचा निधी गोळा केला.
तालुका प्रशासनाने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात १५० बेडचे, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे ७५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे मूलभूत व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची अडचण असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी केले होते.
त्याला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. एका दिवसातच ८० प्राथमिक शिक्षकांनी गुरुवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एक लाख रुपयांचा निधी जमा केला. तालुक्यात ७५० प्राथमिक शिक्षक आहेत. तीन ते चार दिवसांत किमान एकूण ५०० ते ६०० प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार व त्यापुढे अशी स्वेच्छेने मदत गोळा करण्याचा संकल्प शिक्षकांनी केला आहे.
--
सध्याची परिस्थिती लक्षात घेता या पुढील काळात संभाव्य वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड सेंटरमधील बेडची संख्या व सुविधा वाढविण्याची गरज आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत करावी. शिक्षकांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.
-शैलजा राऊळ,
नोडल अधिकारी, कोविड सेंटर, शेवगाव