प्रधानमंत्री किसान योजना : ग्रामसेवकांचा कामास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:26 PM2019-06-23T16:26:33+5:302019-06-23T16:26:43+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लेखे, लाभार्थी निकष पूर्तता आदी बाबी गावपातळीवर तलाठी यांच्याकडे आहेत.
अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लेखे, लाभार्थी निकष पूर्तता आदी बाबी गावपातळीवर तलाठी यांच्याकडे आहेत. मात्र, तलाठ्यांना वगळून या योजनेची अंमलबजावणी करण्याची सक्ती फक्त ग्रामसेवकांनाच का, असा सवाल करीत ग्रामसेवक युनियनने योजनेचे काम करण्यास नकार दिला आहे़
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे राबविणे आवशक आहे. याबाबत स्पष्ट शासन निर्णय असताना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासन निर्णयाशी विसंगत भूमिका घेऊन ग्रामसेवकांना योजनेच्या अंमलबजावणीची सक्ती करीत आहेत़ तसेच प्रसंगी कारवाईची धमकीही देत आहेत. या प्रकारामुळे ग्रामसेवक प्रचंड तणावाखाली आला असून महसूल विभागाच्या दडपशाहीमुळे ग्रामविकास विभागाची मूळ कामे बाजूला जात आहेत. याबाबत तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा ग्रामसेवक या कामकाजावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने दिला आहे. याबाबत राज्याच्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना युनियनने निवेदन पाठविले आहे़ त्यात म्हटले आहे, ग्रामसेवकांकडे केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना, अभियाने, प्रकल्प, दुष्काळ निवारण, मनरेगाची कामे, वृक्ष लागवड, ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज पाहणे अशी अनेक कामे आहेत. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचीही सक्ती केली जात आहे.
सदर शासन निर्णयात ग्रामसेवकांची भूमिका फक्त सहाय्यकाची असताना महसूल विभागाने अन्यायकारक पद्धतीने ग्रामसेवकांना स्वतंत्र आदेश काढून ७० टक्के कामे दिली आहेत. कामे अर्पूण राहिल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे़