पाणी, रस्त्यांसह सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य-आशुतोष काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:08 PM2020-05-23T12:08:17+5:302020-05-23T12:22:28+5:30
कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत. त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिनाभरात अंदाजपत्रक तयार होईल, असे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमत संवाद /
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिनाभरात अंदाजपत्रक तयार होईल, असे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काळे हे नगर दौºयावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आमचे सरकार आले व लगेच कोरोनाचे संकट पुढे उभे राहिले. पण, सरकार आणि जनता या दोघांनी मिळून या संकटाचा चांगला मुकाबला केला आहे. कोपरगाव तालुक्यातही प्रशासनाने या काळात चांगले काम केले. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ही मोठी समस्या आहे. आमचे सरकार येताच पाच नंबर तलावातील माती उचलून नेण्याच्या कामास वेग देण्यात आला. तलावाचे उर्वरित खोलीकरण तसेच वितरिकांचे जाळे तयार करण्यासाठी अंदाजपत्रक करणे सुरु आहे. महिनाभरात हे अंदाजपत्रक तयार होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया तातडीने सुरु केली जाईल. संबंधित मंत्री व सर्व वरिष्ठांचे आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधलेले आहे.
तालुक्यातील शहरी व ग्रामीण या दोन्ही रस्त्यांची समस्या आहेत. जागतिक बँक अथवा इतर सर्व योजनांमधून रस्त्यांसाठी निधी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. तीन वर्षात सर्व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे नियोजन आहे. कोपरगाव बसस्थानकाचे काम सुरु आहे. मात्र, बसस्थानकाशेजारी व्यापारी संकुल असावे अशी मागणी आहे. नाट्यगृहासाठी मिळालेल्या जागेतील अडचण सोडवली आहे. नगरपालिकेच्या इमारतीसाठी आणखी निधी आणावा लागेल. त्यासाठीही आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
गोदावरी कालव्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नूतनीकरण
गोदावरी कालव्यांना शंभर वर्षापेक्षा अधिक कालखंड झाला आहे. या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. शेतकºयांपर्यंत उशिराने पाणी पोहोचते. या कालव्यांबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेसोबत गत फेब्रुवारीमध्ये बैठक झाली आहे. अलिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलतानाही आपण त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. इस्त्रायली तंत्रज्ञान वापरुन या कालव्यांचे नूतनीकरण झाल्यास शेतकºयांपर्यंत वेळेवर पाणी पोहोचेल व पाण्याची गळतीही टळेल. याबाबत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यात अनेक भागात कमी दाबाने वीज पोहोचते. विजेचा दाब वाढविण्याबाबत ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठीही आपण महावितरणकडून आढावा घेत आहोत. शेतीपंपांना वीजजोड मिळत नाही. दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. त्यावरही काय मार्ग काढता येईल, याबाबत आपले प्रयत्न सुरु आहेत.
काकडी विमानतळाशेजारी एमआयडीसी
शिर्डीच्या काकडी विमानतळाशेजारी जागा उपलब्ध आहे. या परिसरात निळवंडे धरणाचे पाणीही येणार आहे. विमानतळ, जागा, पाणी या तीनही गोष्टींची उपलब्धता असल्याने या विमानतळाशेजारी एमआयडीसी उभारता येईल का? याबाबत आपण औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन यांची भेट घेतली आहे. त्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे मान्य केले आहे. काकडी विमानतळावर कार्गो टर्मिनल झाल्यास शेतकरी आपला भाजीपाला इतरत्र पाठवू शकतील. हे टर्मिनल उभारण्याची मागणीही केली आहे.