तुरूंगांची तटबंदी होणार भक्कम
By Admin | Published: September 13, 2014 10:30 PM2014-09-13T22:30:01+5:302024-03-18T16:19:40+5:30
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच तुरूंगांची तटबंदी अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच तुरूंगांची तटबंदी अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी सादर केलेल्या ६० कोटी रूपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार प्रमुख तुरूंगांमध्ये स्कॅनर बसविण्यात येणार आहेत.
राज्यातील तुरूंगांचे २०१४-१५ या वर्षात आधुनिकीकरण करण्यासाठी १ कोटी ८१ लाख ३० हजार रूपये अर्थसंकल्पित आहेत. त्यातून १ कोटी ८ लाख ७८ हजार रूपये खर्चून तळोजा, कोल्हापूर, नाशिकरोड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा मध्यवर्ती तुरूंगांत ३० लाख २० हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी एक बॅगेज स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. यास १० सप्टेंबरला गृह विभागाने मंजुरी दिली.
१३ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०११-१२ ते २०१४-१५ या वर्षासाठी महाराष्ट्रातील तुरूंगांच्या सोयी-सुविधा वाढीसाठी ३० कोटी ५६ लाख १६ हजार व तुरूंगांतर्गत सुरक्षा व्यवस्था सुधारणेसाठी २९ कोटी ४३ लाख ८४ हजार रूपये असा एकूण ६० कोटींचा कृती आराखडा महानिरीक्षकांनी तयार केला. केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विविध प्रयोजनाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सन २०१३-१४ मधील कामांच्या अंदाजपत्रकास गृह खात्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ९ सप्टेंबरला मिळाली. यात तुरूंगांमधील सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी ७ कोटी ६४ लाख ४ हजार व तुरूंगांतर्गत सुरक्षा व्यवस्था सुधारणेसाठी ७ कोटी ५१ लाख ३१ हजार ९०९ अशा एकूण १५ कोटी १५ लाख ३५ हजार ९०९ खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून राज्यातील लहान मोठ्या तुरूंगांची तटबंदी भक्कम होणार आहे.
या तुरूंगांचा समावेश
येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, येरवडा खुले जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह, धुळे जिल्हा कारागृह धुळे, जिल्हा खुले कारागृह पैठण (औरंगाबाद), अकोला जिल्हा कारागृह, भंडारा जिल्हा कारागृह, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नाशिकचे बोस्टल स्कूल. अलिबाग, परभणी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्हा कारागृह, विसापूर जिल्हा कारागृह (अहमदनगर), आटपाटी खुली वसाहत.