‘संजीवनी’च्या अर्पितला सव्वा दोन लाखाचे बक्षिस; कंपन्याच्या वेबसाईट्सचे केले दोष निवारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:55 PM2020-06-02T14:55:24+5:302020-06-02T14:58:21+5:30
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींगमधील तृतीय वर्षातील अर्पित संदीप बोरावके या विद्यार्थ्याने नेटफ्लिक्स व ओयो रूम्स या कंपन्यांच्या वेबसाईट्समधील दोष शोधून कंपन्यांना कळविले. याबद्दल नेटफ्लिक्स कंपनीने त्याला २ लाखांचे बक्षिस दिले.
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींगमधील तृतीय वर्षातील अर्पित संदीप बोरावके या विद्यार्थ्याने नेटफ्लिक्स व ओयो रूम्स या कंपन्यांच्या वेबसाईट्समधील दोष शोधून कंपन्यांना कळविले. याबद्दल नेटफ्लिक्स कंपनीने त्याला २ लाखांचे बक्षिस दिले. तर ओयो रूम्सने २५ हजारांचे बक्षिस देवून अर्पित गौरव केला, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी मंगळवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
या यशाबध्दल अमित कोल्हे यांनी अर्पितच्या घरी जावून त्याचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एन. क्यातनवार, विभागप्रमुख डॉ.डी.बी. क्षीरसागर आजोबा शरद तुकाराम बोरावके, आजी शैला शरद बोरावके, वडील संदीप शरद बोरावके व आई वैशाली बोरावके उपस्थित होते.
नेटफ्लिक्स ही मीडिया सर्व्हिस देणारी अमेरिकन कंपनी आहे. तर ओयो रूम्स ही आॅनलाईन हॉटेल बुकिंग कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांचा प्रायव्हेट डेटा अर्पितने बुध्दी चातुर्याने शोधला आणि तशी माहिती कंपन्यांना कळविली होती. अर्पित संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत असून विद्यार्थी दशेतच तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीपर्यंत जावून पोहचला आहे. ही बाब संजीवनीच्या दृष्टीने अभिमानाची आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.