वृध्देश्वर देवस्थानच्या नवीन विश्वस्त निवडीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 05:46 PM2019-09-18T17:46:59+5:302019-09-18T17:52:08+5:30
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या पुढील पाच वर्षाच्या नवीन विश्वस्त निवडीचा अध्यादेश अहमदनगर येथील धमार्दाय आयुक्ताने बुधवारी एका नोटिशीव्दारे बजावला. त्यामुळे विश्वस्त निवडीचे प्रक्रिया सुरू झाली आहे.
करंजी : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या पुढील पाच वर्षाच्या नवीन विश्वस्त निवडीचा अध्यादेश अहमदनगर येथील धमार्दाय आयुक्ताने बुधवारी एका नोटिशीव्दारे बजावला. त्यामुळे विश्वस्त निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक वृध्देश्वरच्या दर्शनासाठी येतात. देवस्थानला मोठ्या प्रमाणात उत्पन्न असूनही येथे भाविकांना काहीच सुविधा मिळत नव्हत्या. देवस्थानचा विकास होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी व भाविकांनी केल्या होत्या. परंतू देवस्थानच्या घटनेत या देवस्थानचा अध्यक्ष हा अजिवन राहील असे नमुद केलेले होते. याबाबत ‘लोकमत’ने या प्रकरणाला प्रथम वाचा फोडून हा प्रकार उघडकीस आणला होता. ग्रामस्थांनी देवस्थानच्या घटनेत बदल व्हावा यासाठी नगर, पुणे येथील धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मागील महिन्यात पुणे येथील धर्मदाय आयुक्तांनी निकाल देवून देवस्थान कमिटीची निवड अहमदनगर येथील धर्मदाय आयुक्त करतील, असा निकाल दिला होता. त्यावरून नगरच्या धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्त निवडीसाठी नोटीस बजावली आहे. सदर आदेश ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात आला आहे.
वृध्देश्वर देवस्थान विश्वस्तांसाठी इच्छुक उमेदवार हा घाटसिरस (ता.पाथर्डी) येथील रहिवासी असावा. त्याचे वय १८ वर्ष पूर्ण व हिंदू स्त्री किंवा पुरुष असला पाहिजे. विहित नमुन्यातील अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगर येथे १७ आक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयात किंवा त्यापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पोष्टाने अथवा समक्ष येवून पोहोच करावेत. या अर्जासोबत उमेदवाराने स्वत:च्या चारित्र्याचे पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र जोडावे. अर्जातील माहिती खरी असल्याचे १०० रूपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे. मौजे घाटसिरस येथील रहिवासी असल्याचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, असे सहायक धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी नोटिसीव्दारे कळविले आहे.
वृध्देश्वर देवस्थानच्या इतिहासात प्रथमच घाटसिरस ग्रामस्थांना देवस्थानचा कारभार पाहण्याची संधी मिळाली आहे. तरी जास्तीत, जास्त ग्रामस्थांनी देवस्थानच्या विकासासाठी अर्ज करावेत, असे उपसरपंच नवनाथ पाठक यांनी सांगितले.
अखेर आम्हाला न्याय मिळाला. या ऐतिहासिक घटनेमुळे देवस्थानच्या विकासाची दारे उघडली आहेत. या लढ्यात ‘लोकमत’ने महत्वाची भूमिका बजावली, असे तक्रारदार हिमंत पडोळे, एकनाथ पाठक यांनी सांगितले.