कुकडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीची प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:30+5:302021-03-28T04:20:30+5:30
श्रीगोंदा : कुकडी सहकारी साखर कारखान्याने केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मे अखेरीस या ...
श्रीगोंदा : कुकडी सहकारी साखर कारखान्याने केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मे अखेरीस या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली.
कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने शनिवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. घनशाम शेलार, दिनकर पंधरकर, ॲड. बाळासाहेब पवार यांनी सभेत विविध प्रश्न उपस्थित केले. जगताप म्हणाले, कुकडी सहकारी साखर कारखान्याने १५२ दिवसात ६ लाख ६० हजार टन उसाचे गाळप केले आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पातून १२ कोटी ४० कोटी युनिट वीज महावितरणाला निर्यात केली आहे. कारखान्याचा गाळप हंगाम एप्रिल २१ अखेर चालणार असून उसाचे विक्रमी गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने ४५ केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवाने घेतले आहेत. इथेनॉल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास मे २०२१ मध्ये सुरुवात होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक विश्वास थोरात यांनी केले. कारखान्याचे संचालक विष्णूपंत जठार यांनी सूत्रसंचालन केले. विवेक पाटील यांनी आभार मानले.