लघुपट, माहितीपट निर्मितीला हवे निर्मात्यांचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:07 PM2019-12-11T14:07:00+5:302019-12-11T14:10:44+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतिचा कॅमेरा असणारे मोबाईल, कॅमेरा आवाक्यात आणि सहज बाजारात उपलब्ध होत असल्याने आजकालच्या तरूणांना मनाला भावलेला आणि वेगळा वाटणारा विषय चित्रीत करायला जास्त आवडतो. त्यामुळे आजच्या युवकांचा लघुपट आणि माहितीपट निर्मितीकडे कल वाढताना दिसत आहे. हे करताना तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतो. यासाठी निर्मात्यांकडून पाठबळ मिळायला हवे.
अभिव्यक्ती ही मानवी जीवनाची महत्त्वाची गरज आहे. आपल्या मनाला भावलेल्या, अनुभवलेल्या आणि आपण अभ्यासलेल्या अनेक गोष्टी आणि आपले विचार लोकांपुढे मांडण्यासाठी प्रत्येक जण आज प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो वेगवेगळी मार्ग निवडत असतो, कविता, लेख, चित्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो आपला विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडत असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतिचा कॅमेरा असणारे मोबाईल, कॅमेरा आवाक्यात आणि सहज बाजारात उपलब्ध होत असल्याने आजकालच्या तरूणांना मनाला भावलेला आणि वेगळा वाटणारा विषय चित्रीत करायला जास्त आवडतो. त्यामुळे आजच्या युवकांचा लघुपट आणि माहितीपट निर्मितीकडे कल वाढताना दिसत आहे.
एखाद्या घटनेबद्दल आणि हकिकतीबद्दल वास्तव माहिती दर्शविणारा चित्रपट म्हणजे माहितीपट. याची निर्मिती प्रक्रिया संशोधनावर आधारित असल्याने ते खात्रीशीर आणि ऐतिहासिक ठेवा बनतात. माहितीपट बनविण्यासाठी कुठलेही बंदिस्त स्वरूप नाही आणि त्यासाठी वेळेची मर्यादाही नाही. उत्तम माहितीपट बनविण्यासाठी निवडलेल्या विषयाच्या संदर्भात असणारे साहित्य, अभ्यासक, त्यागोष्टी अनुभवणारे वेगवेगळे लोक यांच्याव्दारे माहिती मिळवून संशोधन करणे, त्याची मांडणी करून चित्रीकरण करणे, मुलाखती घेणे आणि सर्व जमवलेल्या माहितेचे संकलन करणे अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते.
महाविद्यालयीन जीवनामध्ये माहितीपट बनविण्याची इच्छा असंख्य तरुणांमध्ये पहाण्यास मिळते. सांस्कृतिक आणि कलेचा वारसा असलेल्या नगर शहरामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण संस्कृती, परंपरा, जगण्यातली वेगळे अनुभव यांची सांगड घालून वेगवेगळे विषय मांडणारे माहितीपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताना दिसतात. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विविध शहरांमध्ये आयोजित होत असल्याने अनेक माहितीपट प्रेक्षकांना अभ्यासता आणि अनुभवायला मिळतात.
अहमदनगरसारख्या शहरात शिकणारा विद्यार्थी ग्रामीण भागातला असला तरी समाजामधील अनेक दुर्लक्षित प्रश्न माहितीपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी धडपडताना दिसतो. परंतू निर्मितीसाठी लागणाºया अनेक तांत्रिक गोष्टी इथे सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या पाठिशी उभा राहून प्रोत्साहन दिले तर नक्कीच नवीन दिग्दर्शक आणि विद्यार्थी वेगवेगळे विषय माहितीपटाद्वारे मांडू शकतील.
आजही आपल्या समाजामध्ये असणारे अनेक घटक संस्कृती, परंपरा, कला दुर्लक्षित आणि अडगळीला पडलेल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कायम माझा प्रयत्न असतो. आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करीत असताना त्या लोकांचे जीवन, निसर्गाविषयी असणारा आदर, परंपरा, कला त्यांचे जगण्यातले अनेक प्रश्न पाहता हे वास्तव जगापुढे आणणे मला जास्त गरजेचे वाटत होते. याचे सादरीकरण वास्तववादी असावे म्हणून ही 'पडाळ' नावाचा माहितीपट मी बनविला. यातून आदिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
अनेक राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचे सादरीकरणही करण्यात आले. चित्रीकरणाच्या वेळी अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. या समस्यांवर मात करायची असेल तर निर्मार्त्यांनी लघुपट, माहितीपट निर्मितीला भक्कम पाठबळ द्यायला हवे. यातून समाज जीवनातील सत्य, वास्तव स्वरुपातील प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होईल, असे मला वाटते. यापुढेही वेगळे आणि दुर्लक्षित विषय प्रेक्षकांच्या भेटीला येतील, यात शंका नाही.
-शुभम राजेंद्र तांगडे, लेखक, दिग्दर्शक.