नगर तालुक्यात ७०० मेट्रिक टन ज्वारीचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:20 AM2021-03-05T04:20:32+5:302021-03-05T04:20:32+5:30
केडगाव : नगर तालुक्यात यंदाच्या मोसमात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. पावसामुळे उशिरा पेरण्या होऊनही तालुक्यातील ...
केडगाव : नगर तालुक्यात यंदाच्या मोसमात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. पावसामुळे उशिरा पेरण्या होऊनही तालुक्यातील २८ हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली. यातून ७०० मेट्रीक टन उत्पादन झाले.
नगर तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाला. त्यातच परतीच्या पावसाने वेळेवर उघडीप न दिल्याने रब्बीतील ज्वारी पिकांची पेरणी लांबणीवर गेली. चांगल्या पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने बागायती क्षेत्रात ज्वारीऐवजी अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली. ज्वारीच्या एकूण क्षेत्रांपैकी तालुक्यात केवळ ४४ टक्के पेरणी झाली. चांगल्या प्रतीची उगवण झालेल्या ज्वारी पिकांवर निसर्गाच्या लहरीपणामुळे सुरुवातीपासून विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. तो शेवटपर्यंत हटलाच नाही. लष्करी अळी, मावा, चिकटा यासारख्या रोगांची ज्वारी पिकांना बाधा झाल्याने पिकांची वाढ खुंटली.
या नैसर्गिक संकटावर मात करूनही शेतकऱ्यांनी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली. यातून तालुक्यात सरासरी प्रति हेक्टरी २५ क्विंटल म्हणजेच ७०० मेट्रिक टनाचे उत्पादन निघाले.
---
ज्वारी काढणीचा खर्च न परवडणारा
तालुक्यात सध्या ज्वारी पिकांची काढणीची कामे सुरू आहेत. पूर्वी ज्वारीच्या काढणीसाठी ‘इर्जिक’ पद्धती शेतकरी वापरत होते. यामधून शेतकऱ्यांचा पैसा अन् वेळ वाचत होता. ही पद्धत काळाच्या ओघात बंद झाली. त्यानंतर पिके काढणीसाठी शेतकऱ्यांना शेतमजुरांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या महागाई वाढली असल्याने मजुरांच्या रोजंदारीत वाढ झाली. ज्वारी काढणीसाठी पुरुष मजुरांना दिवसाकाठी पाचशे ते सहाशे रूपये तर महिला मजुरांना तीनशे ते चारशे रूपये मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. ज्वारी काढणीसाठी एकरी पाच ते सहा हजार रूपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. त्या प्रमाणात मात्र शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न पडत नाही. रोगराईने कणसात दाणे भरले नाहीत. ज्वारी काळी पडल्याने वैरण चाऱ्यालायक निघत नाही. त्यामुळे वैरणीला बाजारात चांगला भाव मिळत नाही.
---
यंदा चांगला पाऊस झाला. यामुळे ज्वारीच्या पेरणीच्या वेळी जमिनीत ओल टिकून राहिली. ज्वारी पिकाला ओलावा मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
-पोपटराव नवले,
कृषी अधिकारी, नगर तालुका
---
आजच्या दिवसात ज्वारी पेरायला परवडत नाही. काढणीसाठी ४०० रूपये रोजंदारी द्यावी लागते. मजूरही भेटत नाही. कितीही मोठा शेतकरी असला तरी ज्वारी, गहू, हरभरा परवडत नाही. बाहेर गावावरून मजूर आणावे लागतात.
-एकनाथ झावरे,
शेतकरी, हिंगणगाव
---
०४ नगर ज्वारी
खारेकर्जुने येथील ज्वारी पिकाची पाहणी करताना कृषी अधिकारी पोपटराव नवले व इतर.