घोंगडी निर्मितीचा व्यवसाय मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:52 PM2019-05-26T16:52:27+5:302019-05-26T16:52:43+5:30

आधुनिकतेच्या काळात मऊ हलक्या अशा ब्लॅँकेट, रजईची मागणी वाढली. यामुळे वजनाला जड व थोडीशी अंगाला टोचणाऱ्या घोंगडीची मागणी अतिशय कमी झाली.

 The production of the blanket is harder | घोंगडी निर्मितीचा व्यवसाय मोडकळीस

घोंगडी निर्मितीचा व्यवसाय मोडकळीस

सुभाष आग्रे
म्हैसगाव : आधुनिकतेच्या काळात मऊ हलक्या अशा ब्लॅँकेट, रजईची मागणी वाढली. यामुळे वजनाला जड व थोडीशी अंगाला टोचणाऱ्या घोंगडीची मागणी अतिशय कमी झाली. या कारणाने खांबे (ता. संगमनेर) या गावातील घोंगडी बनवण्याचा परंपरागत घरगुती व्यवसाय मोडकळीस आला आहे. एकेकाळी २० ते २२ विणकर असलेल्या संगमनेर तालुक्यातील खांबे गावात अवघे दोनच विणकर उरले आहेत.
ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी मेंढपाळ घोंगडीचा वापर प्रामुख्याने केला जातो. यामुळे मेंढपाळ रानावनात फिरताना घोंगडी ही सदैव बरोबर बाळगतात म्हणून ही मेंढपाळांची ओळखच बनली आहे. तसेच घोंगडीने नैसर्गिकपणे अ‍ॅक्युपंक्चर होत असल्याने तिचे वैद्यकीय महत्त्व आहे. यामुळे व्याधी असणाºया रोग्यांना घोंगडी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तरीही हा घोंगडी विणकरांचा व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहे.
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी खांबे (ता. संगमनेर) या गावामध्ये घोंगडी खरेदी विक्रीसाठी बाजार भरला जात होता. त्यावेळी खांबे येथे घरोघरी घोंगडी तयार केली जात होती. घोंगडी ही माग या यंत्रावर बनवली जाते. त्यावेळी खांबे गावात दोनशे मागावर घोंगडी तयार केली जात होती. आता हा घोंगडी बनवण्याचा परंपरागत व्यवसाय मोडकळीस आला असून खांबे या गावात गंगाराम सखाराम जोरी, अहिलाजी सखाराम जोरी हे भाऊ व त्यांच्या भागिनी जानकाबाई सखाराम जोरी यांनी हा व्यवसाय आजच्या काळात जिवंत ठेवला आहे.
घोंगडी बनवण्याचे काम हे वेळ खाऊ तसेच कष्टाचे व जिकरीचे आहे. यामुळे दुपारपर्यंत एकच घोंगडी तयार होते. घोंगडी तयार करण्यासाठी मेंढीची लोकर, चिचोंक्याची खळ यांचा वापर केला जातो. घोंगडी तयार करण्यासाठी रहाट, माग, घोडा तुराई, दातारी, लौकी, पाजणी या पारंपरिक अवजारांचा वापर केला जातो. लोकर पिंजून साफ करून ती पाण्यात ओली करुन रहाटावर लांब धाग्यासारखे बनवले जाते. नंतर मागावर उभे लोकरीचे धागे विणले जातात. त्या धाग्यांना पाजणीवर ‘कुची’च्या साह्याने चिंचोक्याची खळ लावली जाते. यामुळे घोंगडीला कडकपणा येतो. ती खळ वाळल्यानंतर पुन्हा मागावरती आडवे लोकरीचे धागे विणले जातात. अशा प्रकारे ४० इंच बाय ११२ इंच किंवा ४०इंच बाय ६ फुट आकाराची घोंगडी तयार होते. पावसाळ्यात घोंगडीला कोकणामध्ये मागणी असते.

Web Title:  The production of the blanket is harder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.