राहुरीत उसाच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून प्राध्यापक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:15 PM2017-12-04T17:15:49+5:302017-12-04T17:17:10+5:30
शहरातील स्टेशन रस्त्यावरील दत्तनगर येथे सोमवारी दुपारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय ३८, रा. शिलेगाव, ता. राहुरी) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.
राहुरी : शहरातील स्टेशन रस्त्यावरील दत्तनगर येथे सोमवारी दुपारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय ३८, रा. शिलेगाव, ता. राहुरी) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.
ते सीडी डिलक्स मोटारसायकलवरून राहुरीकडून शिलेगावकडे आपल्या घरी जात होते. स्टेशनकडून राहुरीमार्गे कारखान्याकडे निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून शेटे जागीच ठार झाले. दुपारी २ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रॉलीचे चाक त्यांच्या पोटावरून गेले. शेटे राहुरी कारखाना संचलित छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात गेल्या ७ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, वडील, लहान भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
या भीषण अपघातानंतर दत्तनगर परिसरातील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. राहुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, चालक पोलीस उत्तरेश्वर मोराळे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्यास गती दिली. त्यांना वाहतूक सुरळीत करण्यास व रस्त्यावरील अपघातग्रस्त उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली काढण्यास स्थानिक रहिवासी संदीप सोनावणे, मेजर आदिनाथ तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहायक विजय टापरे, वसिम सय्यद, राजेश देशमुख, अनिल चव्हाण, अविनाश फुलसौंदर, सुनील पोपळघट आदींनी मदत करीत वाहतूक सुरळीत केली.