प्राध्यापकांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:03 AM2018-10-06T11:03:17+5:302018-10-06T11:05:17+5:30
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी राज्यभर सुरू केलेल्या संपाचे 11दिवस उलटले तरी तोडगा न निघाल्याने अकराव्या दिवशीही प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी राज्यभर सुरू केलेल्या संपाचे १० दिवस उलटले तरी तोडगा न निघाल्याने अकराव्या दिवशीही प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. आता विद्यार्थीही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. नगर जिल्ह्यात सुमारे ५५ महाविद्यालयांतीन एक हजार प्राध्यापक संपात सहभागी आहेत.
रिक्त जागा भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून प्राध्यापकांचा संप सुरू असल्याने त्याचा अध्यापनावर परिणाम झाला आहे. त्यात आता प्रथम सत्राच्या परीक्षा येणार असल्याने संपावर त्वरित तोडगा न निघाल्यास परीक्षा कामकाजात अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी प्राध्यापकांनी लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देत मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले आदी लोकप्रतिनिधींची भेट प्राध्यापकांनी घेतली.
दुसरीकडे संपाला विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे. गुरूवारी न्यू आर्टस महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपात सहभागी झाले.